183 उद्याेजकांचे कंपनी बंद करण्यासाठी अर्ज

    23-Jan-2021
Total Views |
आकुर्डी, 22 जानेवारी (आ.प्र.) ः पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील 183 उद्याेजकांनी कंपनी बंद करण्यासाठी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज् (आरओसी) कार्यालयाकडे अर्ज केले आहेत.नाेटाबंदी, वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) अंमलबजावणीतील गाेंधळ, आर्थिक मंदी आदी कारणांमुळे उद्याेजकांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.आरओसी कार्यालयातर्फेही उद्याेजकांच्या अर्जांस मंजुरी देण्यात आली आहे.रजिस्ट्रार ऑफ कंपनीज् (आरओसी) कार्यालयाकडे नाेंदणी केल्यानंतर संबंधित कंपनीचा कारभार एका वर्षामध्ये सुरू हाेऊ शकला नसेल किंवा कंपनीची स्थिती, निष्क्रिय कंपनी म्हणून झाली असेल, तर कंपनीची नाेंदणी रद्द करण्याची तरतूद कंपनी कायद्यामध्ये आहे. कायद्यातील या तरतुदींनुसार 183 कंपन्यांनी आकुर्डी येथील नाेंदणी कार्यालयाकडे अर्ज केले हाेते.या कार्यालयाच्या कक्षेत पुणे, सातारा, सांगली, काेल्हापूर, साेलापूर, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या आठ जिल्ह्यांतील कंपन्यांचा समावेश हाेताे.कंपनी रजिस्ट्रार कार्यालयाकडे आलेल्या अर्जांपैकी 183 कंपन्यांची नाेंदणी रद्द करण्यात आली आहे.नाेटाबंदी आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक कंपन्या दाेन वर्षांपासून डबघाईस आल्या हाेत्या. त्याचे प्रतिबिंब कंपन्यांच्या अर्जांवरून उमटल्याचे दिसते. या परिस्थितीमुळे या कंपन्यांना नवीन मशिनरी घेणे परवडत नव्हते.तसेच दरवर्षी कंपनीचा अ‍ॅन्युअल रिपाेर्ट आरओसी कार्यालयाकडे जमा करणेही शक्य हाेत नव्हते. त्यामुळेच या कंपन्या बंद करण्यासंबंधीचे अर्ज आरओसी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.