सील केलेल्या 12 मिळकतींचा लिलाव करण्याची प्रकिया सुरू

    20-Jan-2021
Total Views |
 
ghj_1  H x W: 0
 
पुणे, 19 जानेवारी : उत्पन्न वाढीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलणाऱ्या महापालिका प्रशासनाने मिळकतकर वसुलीबाबतही कडक पावले उचलली आहेत. थकबाकी भरून घेण्यासाठी अभय याेजना राबविताना ऐतिहासिक वसुली करतानाच वर्षानुवर्षे थकबाकी ठेवणाऱ्या मिळकतीही सील केल्या आहेत. यापुढे जाऊन महापालिकेच्या इतिहासात बहुधा प्रथमच सील केलेल्या मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, थकबाकीदारांना हा एकप्रकारे इशाराच असल्याचे बाेलले जात आहे.महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या 90 हून अधिक मिळकती सील केल्या आहेत. मागील तीन महिन्यांच्या कालावधीत व यापूर्वीही सील केलेल्या काही मिळकतींचा यामध्ये समावेश आहे. यापैकी 12 मिळकतींचा लिलाव करून मिळकतकर वसूल करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. या मिळकतधारकांकडे 70 लाख रुपयांहून अधिकची थकबाकी आहे. या मिळकतींचे महापालिकेच्याच नगररचना विभागाकडून मूल्यांकन करण्यात येत आहे. येत्या दाेन दिवसांमध्ये मूल्यांकनाचे काम पूर्ण हाेईल. यानंतर संबंधित मिळकतधारकांना अंतिम नाेटीस पाठविण्यात येईल. त्यांना 15 दिवसांचा अवधी देण्यात येईल. या कालावधीत थकबाकीदारांनी मिळकतकर न भरल्यास फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत या मिळकतींचा लिलाव करण्यात येईल, अशी माहिती करआकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.मिळकतकर थकबाकीसाठी करआकारणी व करसंकलन विभागाच्या वतीने प्रथमच ही कारवाई करण्यात येत असल्याचेही कानडे यांनी नमूद केले.पुणे शहरामध्ये 11 लाखांहून अधिक मिळकतींची करआकारणी झाली आहे. परंतु मागील काही वर्षांत सुमारे तीन लाखांहून अधिक मिळकतधारकांकडे थकबाकी आहे. माेबाइल टाॅवर्सच्या मिळकतकरासह सुमारे 5 हजार काेटी रुपयांची थकबाकी आहे. परंतु यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये दुबार आकारणी, तीन पट दंड तसेच अन्य तांत्रिक बाबींमुळे अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. थकबाकी वसुलीसाठी हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीच्या मान्यतेने 50 लाख रुपयांच्या आतमध्ये थकबाकी असलेल्या मिळकतींसाठी अभय याेजना राबविण्यात येत आहे. एक नाेव्हेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या या याेजनेतून पालिकेला आतापर्यंत 400 काेटी रुपयांहून अधिक थकबाकी वसूल करण्यात यश आले असून, 26 जानेवारीपर्यंत ही याेजना राबविण्यात येणार आहे. यासाेबतच पालिकेने आकारणी न झालेल्या मिळकतींचा शाेध सुरू केला आहे.