हवाई दलासाठी 83 ‘तेजस’ विकत घेण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळ समितीचा निर्णय

    15-Jan-2021
Total Views |

बम,_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 14 जानेवारी (आ.प्र.) : हवाई दलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी संरक्षणाशी निगडित मंत्रिमंडळ समितीने एका महत्त्वाच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिली आहे. हवाई दलासाठी हिंदुस्तान एअराेनाॅटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) 83 मार्क-1 ए तेजस ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची लढाऊ विमाने विकत घेण्याच्या व्यवहाराला मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. 48 हजार काेटींचा हा खरेदी व्यवहार आहे.फेब्रुवारीत याबाबतच्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर तीन वर्षांनी ‘तेजस मार्क-1 ए’ विमानांचा पुरवठा सुरू हाेईल. हवाई दलाने हिंदुस्तान एअराेनाॅटिक्सला आधीच 40 ‘तेजस मार्क 1’ विमानांची ऑर्डर दिली आहे. नवे ‘तेजस मार्क-1 ए’ आधीच्या ‘तेजस मार्क 1’ पेक्षा अधिक अत्याधुनिक आणि घातक आहे. तेजसच्या नव्या आवृत्तीत 43 बदल करण्यात येणार आहेत. भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दृष्टीने हा व्यवहार गेमचेंजर ठरेल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. पुढच्या काही वर्षात तेजस हवाई दलाचा मुख्य कणा बनेल.नव्या तेजसमध्ये अनेक नव्या तंत्रज्ञानाचा समावेश केला जाईल, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. नाशिक व बंगळुरुमध्ये एचएएलने तेजसच्या उत्पादनाच्या दृष्टीने सुविधांची उभारणी केली आहे. एकाच वेळी चीन-पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारताला 42 स्क्वाड्रनची आवश्यकता आहे. सध्या हवाई दलाकडे फक्त 30 स्क्वाड्रन आहेत. प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये 18 फायटर विमाने आहेत.