जाॅर्जियाचा खरा हिरो

    26-Sep-2020
Total Views |
 
ertyguhjkl_1  H
 
दिव्यांग व्यक्तीला सहानुभूतीची आवश्यकता नसते. सर्वसामान्य माणसाला जशी मदत लागते, तशीच मदत दिव्यांगांनाही लागत असते. मात्र, मदत द्या म्हणून करू नये.कारण एखाद्या सामान्य माणसापेक्षाही त्यांच्यामध्ये अधिक ऊर्जा असते. जाॅर्जियाचा क्रीडापटू कायल मेनार्ड याच्याविषयी ऐकल्यावर हे नक्की पटेल.कायल मेनार्डची कथा ऐकली, की खरेचच आश्चर्याचा धक्का बसताे. त्याचा जन्म 1986 च्या मार्च महिन्यात झाला. जन्मतःच त्याला ‘काँजेनिटल म्प्युटेशन’ हा आजार हाेता. याचा अर्थ त्याला काेपरांपर्यंतच हात हाेते आणि दाेन्ही गुडघ्यांपर्यंतच पाय हाेते. या स्थितीतही ताे शाळेमध्ये फुटबाॅल खेळू लागला. एवढेच काय, ताे कुस्ती, मार्शल आर्ट्स, क्राॅसफिट, वेटलिफ्टिंग यांसारख्या खेळांबराेबरच गिरिभ्रमणही करताे.कायल पाेटात असतानाच त्याच्या आई-वडिलांना जन्माला येणाऱ्या आपल्या मुलाला शारीरिक व्यंग आहे, हे डाॅक्टरांकडून समजले हाेते. त्यामुळे गर्भपात करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला हाेता. पण त्याच्या आई-वडिलांनी ते अजिबात मानले नाही. त्यांनी त्याला जन्म दिला. त्याचे सुरुवातीचे आयुष्य अत्यंत खडतर हाेते.त्याला खायचे कसे, इथपासूनच ते बारीकसारीक गाेष्टी शिकवण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी जिवाचे रान केले. ताे शाळेत जाऊ लागला तेव्हा खेळातच करिअर करायचे, असे त्याने ठरवले. त्याने त्यासाठी त्याच्या आई-वडिलांचे मन वळवले. सुरुवातीला ताे फुटबाॅल खेळू लागला. हळूहळू सगळ्याच खेळांमध्ये त्याला रस वाटू लागला. मग त्याने कुस्ती खेळायला सुरुवात केली. स्पर्धेतही भाग घेऊ लागला. सुरुवातीला काही सामने ताे हरला. पण 36 व्या सामन्यात मात्र त्याने यश मिळवले. मग सातत्याने यश मिळू लागले. शाळा संपताना त्याने 35 सामन्यांमध्ये यश मिळवले हाेते आणि केवळ 16 सामने हरला हाेता. शाळेतून बाहेर पडल्यावर त्याने मार्शल आर्ट्स खेळायला सुरुवात केली. एवढेच काय, पाय नसतानाही ताे पर्वताराेहण करू लागला. माऊंट किलिमांजाराे आणि माऊंट काॅनकागुआ यांसारखे अवघड पर्वत त्याने पादाक्रांत केले. बेस्ट अ‍ॅथलेटसारखे अनेक मानसन्मान त्याने मिळवले. आयुष्यात ताे खरा हिराे ठरला.