शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावल्यास कारवाई

    24-Sep-2020
Total Views |
नवी मुंबई पालिकेचे शाळांना निर्देश : तक्रार निवारणासाठी नेमणार समिती

fjdtyku_1  H x  
 
नवी मुंबई, 23 सप्टेंबर (आ.प्र.) : महापालिका क्षेत्रातील खासगी शाळांनी विद्यार्थ्यांवर शैक्षणिक शुल्काची सक्ती करू नये आणि त्यासाठी पालकांकडे तगादा लावू नये, असे निर्देश नवी मुंबई महापालिकेने दिले असून, अशी सक्ती केल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे, तसेच अशा स्वरूपाच्या तक्रारींच्या चाैकशीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी शाळांतील मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. पालिकेचे शिक्षणाधिकारी याेगेश कडुसकर यावेळी उपस्थित हाेते.काेराेना व लाॅकडाऊनमुळे सध्या सर्व शाळांचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत.शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे ऑनलाइन शिक्षणातून विद्यार्थ्यांना कमी करणे, शुल्कासाठी सक्ती करणे, निकाल न देणे आदी तक्रारी शिक्षण विभागाकडे येत असल्याचे काकडे यांनी निर्दशनास आणून दिले, तसेच शाळांनी पालकांची बाजू समजून घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.प्रत्येक शाळेने आपल्या शाळेत तक्रारपेटी व सूचनापेटी दर्शनी भागात लावावी, तसेच शुल्काचा तपशील दर्शवणारा फलकही दर्शनी भागात लावावा, असे निर्देश काकडे यांनी दिले.शैक्षणिक शुल्काबाबत प्राप्त हाेणाऱ्या तक्रारींच्या निराकरणासाठी महापालिकेने समिती स्थापन करावी. ज्या शाळेबाबत तक्रार येईल, त्या शाळेत प्रत्यक्ष जाऊन ही समिती चाैकशी करेल, असे निर्देशही काकडे यांनी दिले, तसेच या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित शाळेवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.महापालिकेच्या शिक्षण विभागानेही पालकांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी विभागात तक्रारपेटी व सूचनापेटी तयार केली आहे, तसेच शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारींसाठी पालक 022- 27577067 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.