मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय याेजना राबविण्याचा प्रस्ताव

    24-Sep-2020
Total Views |
 
awze5s647d5ki_1 &nbs
 
पुणे, 23 सप्टेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क, पुणे) : मिळकतीवर आकारण्यात येणारी तीन पट शास्ती व दंडामुळे माेठ्याप्रमाणावर मिळकतकराची थकबाकी वाढली आहे. मागील वर्षी पावसामुळे झालेले नुकसान, तसेच यंदाच्या वर्षी काेराेना संसर्गामुळे आलेले आर्थिक अरिष्ट या पार्श्वभूमीवर थकबाकीदार मिळकत धारकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी थकबाकीवर दरमहा आकारण्यात आलेला 2 टक्के माफ करण्यासाठी 2 ऑक्टाेबर ते 30 नाेव्हेंबर या कालावधीत मिळकतकर अभय याेजना राबवावी, असा प्रस्ताव सदस्यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.स्थायी समितीतील सदस्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला असून, येत्या गुरुवारी अर्थात दि. 24 सप्टेंबर राेजी मान्यता देण्यात येईल, असे दिसून येत आहे. शहरातील निवासी, बिगरनिवासी, तसेच माेबाइल टाॅवरची मिळकतकर थकबाकी 5 हजार 739 काेटी रुपयांवर पाेहाेचली आहे. माेबाइल टाॅवर वगळता शहरातील निवासी व बिगर निवासी अशा 5 लाख 34 हजार 410 मिळकतींची थकबाकी ही 2 हजार 117 काेटी रुपये आहे.
थकबाकीवर दरमहा आकारण्यात येणारा 2 टक्के दंड, तसेच विनापरवाना बांधलेल्या मिळकतींवर आकारण्यात येणाऱ्या दंडामुळे ही थकबाकीची रक्कम वाढत जाऊन 2 हजार 468 काेटी रुपयांवर पाेहाेचली आहे. दरमहा आकारण्यात येणाऱ्या शास्तीमुळे मिळकतकराची थकबाकी वाढत असल्याने अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर, ही रक्कम आवाक्याबाहेर असल्याने ती भरण्याकडे मिळकतधारकही पाठ फिरवत आहेत.याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावरही हाेत आहे.प्रत्यक्षात माेबाइल टाॅवर्सच्या मिळकतकराचा वाद हा न्यायालयात असल्याने सदस्यांनी यातून माेबाइल टाॅवर्स या याेजनेतून वगळले आहेत. मागील वर्षी शहरात पावसामुळे झालेले आर्थिक नुकसान, तसेच यावर्षी काेराेना संसर्गामुळे आलेल्या आर्थिक अरिष्टाचा परिणाम राेजगार, उद्याेग व व्यवसायावर झाला आहे. आर्थिक घडी विस्कळीत असताना दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कराच्या बाेज्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.