भारतीय समाजात सर्वत्र विभागणी झालेली आहे

    20-Sep-2020
Total Views |
 
zdbgxgfn_1  H x
 
भारतीय समाज आज अशा स्थितीत येऊन पाेचला आहे की, एकही क्षेत्र राजकीय प्रभावापासून अलिप्त राहिलेले नाही. अशी स्थिती आजपर्यंत निदान मीतरी कधीही अनुभवलेली नाही किंवा गतकाळातही अशी स्थिती असल्याचं ऐकण्यात वा वाचनात नाही.
राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ऐकमेकांचे विराेधक असणे स्वाभाविक आहे, पण राजकीय क्षेत्राशी संबंध नसलेले लाेकही एकमेकांचे शत्रू झालेले आहेत. पत्रकारांची विभागणी तर झालेली आहेच पण लेखक, साहित्यिक, कवी, खेळाडू, नाटककार, सिनेकलावंत, चित्रकार, गायक, नृत्यकलाकार याशिवाय उद्याेजक, व्यापारी, व्यावसायिक ज्यात डाॅक्टर्स, वकील, करसल्लागार यांच्यासह शिक्षक नि विद्यार्थी यांचीही विभागणी झालेली आहे. एकंदर राजकीय वैमनस्याने आपला प्रादुर्भाव सर्वत्र केला आहे.राजकीय वैमनस्याच्या या विद्वेषी प्रभावापासून मैत्री आणि नातेसंबंधही अलिप्त राहिलेले नाहीत. अशी भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. मग इतर बाबतीत विचारही करवत नाही.भविष्यात काेणत्या गीतकाराची, काेणत्या गायकाची वा संगीतकाराची गाणी काेणी ऐकायची याचेही मापदंड तयार हाेतील. राजकीय सत्ता काेणाची, यावरच क्रिकेट टीममधे काेणते खेळाडू असतील, हे ठरवले जाईल. सिनेमे काेणत्या विषयांवर आणि काेणी बनवायचे हे ठरवले जाईल.एवढेच नव्हे तर त्यात काेणते कलाकार असावेत इथपासून ते गीतकाराने काय शब्द वापरायचे त्यासाठी काेणी संगीत द्यायचे हेसुद्धा कलाकारांची राजकीय भूमिका बघूनच ठरवले जाईल.एवढेच नव्हे तर काेणते चित्रपट उचलून धरायचे आणि काेणते पाडायचे, याच्याही ीीींरींशसळशी ठरवल्या जातील.काेणाचे नृत्य चांगले, काेणता चित्रकार चांगले चित्र काढताे याचेही नियम राजकीय विराेधक वा समर्थक ठरवू लागतील.कथा, कादंबऱ्या, नाटक यांनाही हाच नियम लागू हाेईल.कारण स्वतंत्र असे काहीच असणार नाही, सर्व काही राजकीय हेतूने प्रेरित असेल.इतिहास संशाेधन हा विषय तर आधीच या विभाजन धाेरणाने प्रदूषित झालेला आहे. प्रत्येकवेळी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची जात नि धर्म पाहूनच स्वीकृती वा विराेध ठरवला जात आहे. इतिहासातील प्रत्येक लढ्यांचे जेते, प्रत्येक समाजाचे आद्यकवी, आद्यक्रांतिकारक, आद्यलेखक, आद्यमहापुरुष असे सर्वांचे ’आद्य’ वेगवेगळे आहेत. कारण आद्यपणाचे श्रेय आपल्याशिवाय इतर काेणत्याही समाजाच्या व्यक्तीला मिळता कामा नये, ही विभाजनकारी भूमिका सर्वत्र आढळून येत आहे.विज्ञान संशाेधनाचे क्षेत्रही या विघटनकारी वृत्तीपासून अलिप्त राहिलेले नाही. विमानाच्या वा प्लॅस्टिक सर्जरीच्या शाेधापासून विभाजनाच्या भूमिकेतून श्रेयवादाचे सर्वत्र वाद आहेत.अशा विभाजनकारी वातावरणात निरपेक्षपणे सत्यान्वेषण करू पाहणारी व सत्याची बाजू घेणारी काेणीही व्यक्ती आज घडीला समाजाच्या दृष्टीने निरुपयाेगी ठरण्याचा हा काळ आहे. एकंदर पाहता सत्य हेच निरुपयाेगी ठरले आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचा अर्थ सत्य हेच सर्वश्रेष्ठ असते असा नव्हे. पण या विभाजनाला राेखण्याची शक्ती असणारं सत्य आजची गरज असूनही ते कुठेही दूरदूरवरसुद्धा दिसत नाही ही खेदाची बाब आहे.भारतीय समाजात पसरलेलं हे विभाजनाचे व द्वेषाचं विष कसं संपवायचं, हा माेठा प्रश्न आज समाेर आहे. उद्या किंवा परवा सत्ता बदलेलही, सत्तेतील राजकीय पक्ष सत्तेबाहेर जातील आणि नवीन सत्ताधीश येतील. पण समाजात पसरलेल्या या विभाजनकारी व द्वेषी वृत्ती कशा बदलतील याचा विचार आज करताना काेणीही दिसून येत नाही. अशा विभाजनाचा आपल्या भावी पिढ्यांवर नक्की काेणता परिणाम हाेईल, याचीही तमा अगदीच मूठभर लाेक साेडले तर बाळगताना दिसत नाही.सरकारे जातील, सरकारे येतील पण समाजाच्या प्रत्येक घटकात निर्माण झालेला द्वेष कसा संपवायचा, याची उपाययाेजना काेणाकडे काही आहे का?