जगण्याचे ओझे सुसह्य करणारी नाती

    19-Sep-2020
Total Views |
स्वत:साठी जगावे असे काही उरले नाही, तरी प्रेम, मैत्री व नातेसंबंध काही जणांना जगत राहण्याची प्रेरणा देत राहतात.

zdbxcfyjfcyuvk_1 &nb 
 
जन्मप्राप्त नाती, वाटेत सापडून दृढ झालेले मैत्र, दाेन जिवांना जाेडणारे प्रेम या काही विलक्षण गाेष्टी आहेत. मानवी मनाचे साैंदर्य वाढविणाऱ्या, संस्कृती समृद्ध करणाऱ्या, जीवनार्थाची चाहूल देणाऱ्या, समाजाला आकार, आधार व पाेषण देणाऱ्या अशा या गाेष्टी आहेत. काही नाती झाडावरील फुलासारखी जपली तर टवटवीत राहतात. काही नाती त्यांच्या मानसिक आधारांपासून ताेडली व रुक्ष अतिशिस्तित, अवाजवी निर्बंधात, मिठीऐवजी मुठीत वागविली तर काेमेजून जातात, त्यांचे निर्माल्य तेवढे हाती उरते.
प्राणी पाळावा तशी काही नाती वरवर प्रेम व अंतर्गत स्वामित्व बाळगत पाळली जातात. निष्ठेचे अवडंबर माजते तेव्हा खरे तर माणसे व्यक्तिस्वातंत्र्य गमावून बसतात. प्रेमात, मैत्रीत काही प्रमाणात व्यक्तिस्वातंत्र्याचा संकाेच हाेताे व काही काळ ताे आनंददायी असताेदेखील. काही नातेसंबंध जुळून येतात तर काही आयुष्यभर जुळवून घ्यावे लागतात. रक्ताची नाती मायेची ओल संपली, की सक्तीची बनत जातात. काही नाती आपुलकीवर वाढतात, तर काही केवळ वारसाहक्काच्या कमजाेर धाग्यांवर टिकलेली दिसतात.
नातेसंबंधातील दुरावा व त्यामुळे उद्भवणारा मानसिक त्रास हा मानसशास्त्रात वर्गीकृत अभ्यासाचा विषय आहे. नात्यांमधील संवाद, विचारवर्तन भावना, संप्रेसणातील दाेष, व्यक्तिमत्त्वांमधील न जुळून येणारे वृत्तीदाेष आदी गाेष्टींबाबत आधुनिक मानसशास्त्र संशाेधन करीत आहे. डीएसएम-4 सुधारित वर्गीकरणात नातेसंबंधातील दाेष विकृतींचा समावेश आहे. मात्र याचा अर्थ नातेसंबंध संपत चालले आहेत, असा घेऊ नये.सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक उलथापालथीमध्ये माणसे केंद्रस्थानावरून परिघावर फेकली जात असल्याने नातेसंबंधाची वीण विस्कटण्याचे प्रकार घडणार.काय घडते आहे हे थाेडे थबकून नीट पाहिले तर यातून मानवी संबंधाचा नवा, ताजा आविष्कार जन्म घेईल, असे लक्षात येते.स्वत:साठी जगावे असे काही उरले नाही, तरी प्रेम, मैत्री व नातेसंबंध काही जणांना जगत राहण्याची प्रेरणा देत राहतात. अशी नाती पूर्णविरामाकडे झेपावणाऱ्या जीवनाला स्वल्पविरामाची अल्पकाळ विश्रांती व उसंत देतात, जगण्याचे ओझे थाेडे सुसह्य करतात.