कांदा निर्यातबंदी विराेधात शेतकरी संघटनांचा आंदाेलनाचा इशारा

    17-Sep-2020
Total Views |
 
drhasrth_1  H x
 
पुणे, 16 सप्टेबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकरी संघटना नाराज झाल्या असून, शेतकऱ्यांचे नुकसान करणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त हाेत आहे. आंदाेलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा माेठा विश्वासघात केला आहे. बिहारची निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काेट्यवधींचे नुकसान हाेणार आहे. अगाेदरच काेराेना महामारीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर माेठा आघात हाेणार आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा किसान सभा तीव्र शब्दांत धिक्कार करत असून, सरकारच्या या निर्णयाच्या विराेधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बराेबर घेत तीव्र आंदाेलन उभारले जाईल, असा इशारा दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी कांदा नियंत्रणमुक्त केला आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला, असा ढाेल वाजविला गेला. आणि आता कांद्यावर निर्यातबंदी घातली. वेळ येताच दलालांना पैसे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरीविराेधी हा तुघलकी निर्णय घेतला. या बांडगुळांना पाेसण्यासाठी शेतकऱ्यांप्रति बेगडी प्रेम दाखवून अजून किती दिवस शेतकऱ्यांचा बळी घेणार आहात? असे त्यांनी नमूद केले आहे.शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कांद्याचे दर थाेडे वाढल्यानंतर केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. केंद्र सरकारला शेतकऱ्यांना सुख लागू द्यायचे नाही असे दिसते.