85 टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षेला पसंती

    17-Sep-2020
Total Views |

dhstrhj_1  H x
 
पुणे, 16 सप्टेंबर (आ.प्र.) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या पर्यायातून सुमारे 85 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेला पसंती दिली आहे. एकूण 1 लाख 85 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला असून, त्यापैकी सुमारे 1 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी माेबाइलद्वारे परीक्षा देणार असल्याचे नमूद केल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली.सर्वाेच्च न्यायालयाने पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठाने 1 ऑक्टाेबरपासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दाेन्ही माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, ऑनलाइन परीक्षेसाठी सुविधांची अडचण लक्षात घेऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन यातून पर्याय निवडण्यास सांगितले हाेते. त्यासाठी 14 सप्टेंबपर्यंतची मुदत दिली हाेती. त्यानुसार साेमवारी सायंकाळपर्यंत संकलित झालेल्या माहितीनुसार 85 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेला पसंती दिली आहे.विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील महाविद्यालयांतील अंतिम वर्षाचे जवळपास 2 लाख 40 हजार विद्यार्थी आहेत. त्यातील 1 लाख 85 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेला पर्याय निवडला.त्यापैकी 1 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी माेबाइलद्वारे परीक्षा देणार असल्याचे नमूद केले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी लॅपटाॅप, संगणक, टॅब्लेटद्वारे परीक्षा देणार असल्याचे सांगितले आहे. तर ऑफलाइन परीक्षेसाठी 38 हजार विद्यार्थ्यांनी तयारी दर्शवली आहे, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली.ऑनलाइन परीक्षा अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी नवीन असल्याने त्यांना तयारीसाठी सुविधा दिल्या जाणार आहेत.विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना तयारीसाठी नमुना प्रश्नसंच पुढील काही दिवसांत दिला जाणार आहे.तसेच ऑनलाइन परीक्षेची तयारी हाेण्याच्या दृष्टीने त्यांना सराव चाचणी परीक्षेची (माॅक टेस्ट) सुविधाही उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या प्र.कुलगुरू डाॅ. एन. एस. उमराणी यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने घेतल्याचे डाॅ. काकडे यांनी स्पष्ट केले.