आराेग्य विभागातील सर्व पदे तातडीने भरणार : राजेश टाेपे यांची माहिती

    16-Sep-2020
Total Views |

dhsrh_1  H x W: 
 
मुंबई, 15 सप्टेंबर (आ.प्र.) : काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्याच्या दृष्टीने आराेग्य विभागातील सर्व पदे राज्य सरकार तातडीने भरणार असून, काेव्हिड काळात काम करणारे डाॅक्टर व परिचारिकांना वाढीव प्राेत्साहन भत्ता देण्याच्या दृष्टीने राज्य सरकार निश्चितपणे विचार करेल, असे आश्वासन आराेग्य मंत्री राजेश टाेपे यांनी दिले.काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्याच्या दृष्टीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार, टाेपे यांनी चंद्रपूरमधील लाेकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीला खासदार बाळू धानाेरकर, आमदार सुभाष धाेटे, आमदार किशाेर जाेरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अधिष्ठाता डाॅ. माेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राठाेड उपस्थित हाेते. टाेपे यांनी यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील काेराेनास्थितीचा आढावा घेतला.चंद्रपूर जिल्ह्यातील 11 तालुके मानव विकासांतर्गत येतात. त्यामुळे प्रत्येकी 1 काेटी निधी या तालुक्यांना उपलब्ध करणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयांना विशेष निधी द्यावा, नागरिकांमध्ये सजगता निर्माण व्हावी, यादृष्टीने जनजागरण माेहीम हाती घ्यावी, अशा मागण्या मुनगंटीवार यांनी केल्या.मुनगंटीवार यांनी सुचवल्याप्रमाणे बीएएमएस, एमबीबीएस डाॅक्टर, नर्सेसची माहिती मागवून त्यांना थेट नियुक्ती देण्याचे निर्देश टाेपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. खासगी रुग्णालयांतील डाॅक्टर, नर्सेस, सफाई कामगार आदींना विमासंरक्षण देण्याची मागणी रास्त असून, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून याेग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन टाेपे यांनी दिले.