थेट बांगलादेशात जाणार उत्पादकांची संत्री
नागपूर, 15 सप्टेंबर (आ.प्र.) : विदर्भातील संत्रा उत्पादकांना लवकरच त्यांचा माल थेट बांगलादेशात आणि ताेही कमी वेळेत पाठवता येणार आहे.विदर्भातून थेट बांगलादेशात शेतमाल पाठवण्यासाठी विशेष किसान रेल सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला रेल्वे विभागाने मंजुरी दिली असून, याचा आराखडाही तयार करण्यात येत आहे.यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, तसेच सूक्ष्म- लघू-मध्यम उद्याेगमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक झाली. विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी बांगलादेश ही माेठी बाजारपेठ मानण्यात येते. दरवर्षी सुमारे अडीच लाख टन संत्री बांगलादेशात निर्यात करण्यात येतात. विदर्भातून बांगलादेशपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी साधारणत: 72 तास लागतात. रेल्वेने हेच अंतर 36 तासांत पार करता येणे शक्य आहे. माल लवकर पाेहाेचल्यास त्याची गुणवत्ता कायम राहील व वाहतुकीचा खर्चही कमी हाेईल, अशी शेतकऱ्यांची भूमिका हाेती.
गडकरी यांनी यासंदर्भात रेल्वे विभागाला प्रस्ताव सादर केला हाेता. गडकरी यांच्या समवेतच्या बैठकीत या प्रस्तावाला रेल्वेने हिरवा झेंडा दाखवल्याची माहिती मध्य रेल्वेचे डीआरएम साेमेश कुमार यांनी दिली. ही विशेष रेल्वे 20 डब्यांची असेल. त्यातून 460 टन माल वाहून नेता येईल. वरुड, काटाेल, नरखेड स्थानकांवरून शेतकरी आपला माल या गाडीतून पाठवू शकतील. यासाठी विशेष संकेतस्थळ तयार करून शेतकऱ्यांकडून आधीच बुकिंग घेण्याची सूचना गडकरी यांनी यावेळी केली.