अतिर्नित देयकांची 32 लाखांवरील रक्कम परत

    16-Sep-2020
Total Views |
नवी मुंबई, 15 सप्टेंबर (आ.प्र.) : काेराेनाबाधितांकडून अधिकची देयके वसूल केली गेल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने देयके व कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करण्यात येऊन, एकूण 32 लाख 422 रुपयांची रक्कम नवी मुंबई महापालिकेने संबंधितांना परत केली.शहरातील काही रुग्णालयांकडून जास्तीचे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी काेराेना रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत आहेत. त्याची गंभीर दखल घेत आयुक्त अभिजित बांगर यांनी अशा तक्रारींच्या निवारणासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या (1) अध्यक्षतेखाली विशेष लेखा परीक्षण पडताळणी समितीची स्थापन केली आहे. या समितीला देयकांच्या पडताळणीत प्रथमदर्शनी दाेष आढळलेल्या 10 खासगी रुग्णालयांना महापालिकेने कारणे दाखवा नाेटीसही बजावली हाेती. याच प्रकरणांतील एकूण 32 लाख 422 रुपयांची रक्कम संबंधितांना परत देण्याचे आदेश पालिकेने संबंधित रुग्णालयांना दिले आहेत. प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी पालिकेने समन्वय अधिकारी नियुक्त केला आहे, तसेच सर्व काेव्हिड रुग्णालयांतील देयकांच्या पडताळणीसाठी विशेष लेखा परीक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. देयक पडताळणीदरम्यान एखाद्या रुग्णालयाकडून देयकांत वारंवार विसंगती केल्याचे आढळल्यास अशा रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईचा इशारा पालिकेने दिला आहे.