बांधकाम परवानगी शुल्क भरण्यास ठाण्यात मुदत

    16-Sep-2020
Total Views |
बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी ठाणे पालिका महासभेत प्रस्ताव

srthsrj_1  H x  
 
ठाणे, 15 सप्टेंबर (आ.प्र.) : काेराेनामुळे अडचणीत आलेल्या बांधकाम व्यवसायाला सावरण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे, तसेच इतरही सुविधा देण्याचे निश्चित केले आहे. त्याच अनुषंगाने आता ठाणे महापालिकेने शहरातील बांधकाम व्यावसायिकांना सावरण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार महापालिकेने बांधकाम परवानगी अनुषंगाने भरणा करण्याच्या विविध शुल्कांचे दर निश्चित केले असून, या शुल्कांचा भरणा हप्त्यांमध्ये करण्यास वाढीव सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.काेराेनाच्या अनुषंगाने बिकट आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीमवर मुंबई महापालिका, एसआरए आदी प्राधिकरणांनी इमारत बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने प्राधिकरणास भरणा शुल्कात टप्प्यानिहाय प्रदानाची सवलत दिली आहे, तसेच ठाणे एमसीएचआयनेही तशा आशयाची मागणी महापालिकेकडे केली हाेती. त्यानुसार महापालिकेने विविध शुल्कांचा भरणा हप्त्यांमध्ये करण्यास वाढीव सवलत देण्याचे निश्चित केले. या संदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.दरम्यान, 20 ऑगस्ट 2019 राेजी महासभेने मंजुरी दिलेल्या दरपत्रकानुसार या शुल्कांचा भरणा टप्पेनिहाय हप्त्यांत करण्यात येणार आहे. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकांनी विकास शुल्क, अतिरिक्त भूनिर्देशांक प्रिमियम, पायाभूत सुविधा शुल्क, छाननी, इमारत परवाना छाननी शुल्क, फायर स्टेअरकेस अधिमूल्य, सज्जा, औद्याेगिक जमिनीचा वापर, पार्किंग तरतूद, अनधिकृत बांधकाम व वापराबाबत शुल्क, सुधारित नकाशे शुल्क, किफायतशीर वापरापाेटीचे शुल्क, परवानगी अनामत, तात्पुरते बांधकाम शुल्क, अस्तित्वातील इमारतीच्या गच्चीवर माेबाइल टाॅवर, साेसायटी ऑफिस, टाॅयलेट, वाॅचमन केबिन आदींसह इतर बाबींसाठी टप्प्याटप्प्याने शुल्क भरण्यास संधी दिली जाणार आहे. त्यांना हे शुल्क तीन टप्प्यांत भरण्याची सवलत मिळणार आहे. मंजुरी मिळालेल्या बांधकामांनाही शुल्कांचा भरणा करण्यासाठी अशीच सवलत दिली जाणार आहे.