हसत असणाऱ्या सर्वच व्यक्ती मनातून सुखी, आनंदी असतीलच असे नाही. चार्ली चॅपलीन हे एक चांगलं उदाहरण आहे, जे तुम्हाला माहीत आहे.
काही व्यक्तींना अगदी लहान लहान गाेष्टींवरही रडायला येतं, अशा माणसांवर लाेक हसतात, रडूबाई म्हणत चिडवतात; परंतु अशी व्यक्ती मनाने फार स्वच्छ आणि हळवी असते. कारण संवेदनशील असते, त्यामुळे जरा जराशा गाेष्टींसाठी त्यांच्या डाेळ्यात पाणी येतं.काही व्यक्ती अशा असतात, ज्या साध्या साध्या गाेष्टींवर चिडत असतात, रागवत असतात.अशा व्यक्तींच्या वागण्यावर जाऊ नका तर त्या व्यक्तीला समजून घ्या. कारण ती व्यक्ती मनातून फार एकटी आणि अस्वस्थ असू शकते. त्या व्यक्तीला प्रेमाची गरज असेल, जे तिला काेणाकडूनही मिळालेलं नसतं.त्या व्यक्तीचं अशा वागण्यामुळे तिला चुकीचं जज करू नका, तर त्यामागची अवस्था समजून घ्या. माणसं समजून घ्यायला शिकायला हवं. माणसांचा स्वभाव ओठात एक आणि पाेटात एक असा असताे, तसेच काही माणसे फार हळवी असतात, त्यांच्या मनात एक असतं आणि ती वागतात मात्र वेगळंच. मनातून दु:खी असलेली व्यक्ती आपलं दु:खं काेणाला कळू नये म्हणून ते मनात दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत चेहऱ्यावर मात्र हास्य ठेवण्याचा प्रयत्न करते.चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारे अनेक नट मनाने खूप हळवे आणि प्रेमळ असतात; परंतु आपण त्यांच्या भूमिकेवरून त्यांचा स्वभाव ठरवत असताे. माणूस जसा दिसताे तसा ताे नसताे, प्रत्येक जण मनाचं खरं प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटू न देता खाेटा मुखवटा धारण करून जगात वावरत असताे.