थिएटरच्या जागेवर इतर व्यवसाय करायला परवानगी द्या

    14-Sep-2020
Total Views |
सिंगल स्क्रीन थिएटर मालकांची सरकारकडे मागणी; काेराेनाच्या पार्श्वभूमीवर थिएटर चालवणे अवघड

sdthsrty_1  H x 
 
पुणे, 13 सप्टेंबर (आ.प्र.) : सिंगल स्क्रीन थिएटर चालवणे सध्या फारच जिकिरीचे झाले आहे. शिवाय, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सहा महिन्यांपासून थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे सिंगल स्क्रीन थिएटर बंद करून त्या जागेवर इतर व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी एक पडदा चित्रपटगृह (सिंगल स्क्रीन) मालकांच्या पूना एक्झिबिटर्स असाेसिएशन या संघटनेने केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात आपली व्यथा मांडली आहे.संघटनेचे अध्यक्ष सदानंद माेहाेळ, सहसचिव दिलीप निकम, माजी अध्यक्ष दीपक कुदळे आणि माजी खासदार व चित्रपट व्यावसायिक अशाेक माेहाेळ यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र असून, ते मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.एकपडदा चित्रपटगृह (सिंगल स्क्रीन थिएटर्स) मालकांना चित्रपटगृह बंद करून इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी या पत्रातील मुख्य मागणी आहे. ती मागणी मान्य झाली, तर सरकारला वाढीव उत्पन्नाचे स्राेत (रेव्हेन्यू) मिळतील, असेही पत्रात म्हटले असून, आत्ता जे थिएटर मालक आहेत, त्यांनाही त्यांच्या गुंतवणुकीवर याेग्य रिटर्न्स मिळण्याचा मार्ग माेकळा हाेईल, अशी अपेक्षा पत्रामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.पत्रात म्हटले आहे, की राज्य सरकारने वर्ष 2000 मध्ये मल्टिप्लेक्स चित्रपटगृहासंबंधी कायदा करून त्यांना विविध सवलतींसह प्राेत्साहन दिले हाेते. मात्र, सिंगल स्क्रीनच्या वाट्याला निराशा आली. शिवाय, हा थिएटरचा व्यवसाय बंद करून दुसरा व्यवसाय करण्यासाठीचा काेणताच मार्ग सरकारने शिल्लक ठेवलेला नाही. थाेडक्यात म्हणजे, एकपडदा चित्रपटगृह चालकांची परिस्थिती राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा वेगळी नाही.दूरचित्रवाणी, ओ.टी.टी. प्लॅटफाॅर्म, नेटफ्लिक्स, अमेझाॅन असे स्वस्त आणि घरबसल्या उपलब्ध हाेणारे पर्याय आता प्रेक्षकांपुढे उपलब्ध आहेत.त्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यास उत्सुक नाहीत. अशा परिस्थितीमध्ये चित्रपटगृह बंद करण्याची कायदेशीर परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.चित्रपटगृह चालक असलेले सगळेच सभासद अर्धपाेटी राहण्यापेक्षा, काही चित्रपटगृहे बंद झाली, तर निदान उरलेल्यांचे पाेट भरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.