नकारात्मक गुणांसाठी एमपीएससीची नवी गुणपद्धती जाहीर

    11-Sep-2020
Total Views |

fdgg_1  H x W:
 
मुंबई, 10 सप्टेंबर (आ.प्र.) : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांसाठी नकारात्मक गुणांच्या अंमलबजावणीसाठी (निगेटिव्ह मार्किंग) सुधारित कार्यपद्धत जाहीर करण्यात आली आहे. यातील दाेन महत्त्वाचे बदल म्हणजे आता येथून पुढे परीक्षांचा निकाल अपूर्णांकात लागणार आहे. तसेच, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत.आयाेगाकडून यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. आयाेगामार्फत आयाेजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांसाठी चार चुकीच्या उत्तरांबद्दल एक गुण वजा करण्याबाबतची नकारात्मक गुणांची पद्धत (निगेटिव्ह मार्किंग) 2009 मध्ये प्रथम लागू करण्यात आली. त्यानंतर राज्य सेवा परीक्षेच्या संदर्भात नकारात्मक गुण वजा करण्याची कार्यपद्धती काही बदलांसह अबलंबण्यात आली. या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांसाठी यापूर्वी अवलंबण्यात येत असलेल्या सर्व कार्यपद्धती अधिक्रमित करून यापुढे सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांसाठी नवी कार्यपद्धती निश्चित करण्यात येत असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येतील.एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असल्यास अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही, असेही आयाेगाने स्पष्ट केले आहे.