स्वीडनच्या चर्चमध्ये प्रथमच पुरुषांपेक्षा महिला धर्मगुरूंची संख्या जास्त

06 Aug 2020 10:58:53
 
4wzret_1  H x W
 
स्टॉकहोम, ५ ऑगस्ट (वि.प्र.) : स्वीडनमधील चर्चच्या इतिहासात प्रथमच पुरुषांपेक्षा महिला धर्मगुरूंची संख्या जास्त झाली आहे. स्वीडनमधील सर्व चर्चमधील धर्मगुरूंची एकूण संख्या ३०६० असून, त्यापैकी १५३३ महिला आहेत. ही ऐतिहासिक घटना असल्याचे स्वीडन चर्चच्या सेक्रेटरी क्रिस्टिना ग्रेनहोम यांनी प्रतिपादन केले आहे. ही संख्या २०९० पर्यंत  अपेक्षित होती, ती २०२० मध्येच झाली आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्य्नत केला. कॅथॉलिक चर्चच्या तुलनेत स्वीडनमधील ल्युथरन चर्चमध्ये 'मिस्सा' (पूजाविधी) करण्याचा अधिकार महिलांना ६० वर्षांपूर्वी १९५८ मध्येच मिळाला होता. यानंतर १९६० मध्ये प्रथमच तीन महिलांनी ही जबाबदारी स्वीकारली होती; पण पुरुष धर्मगुरू महिला धर्मगुरूंना सहकार्य  करीत नव्हते. परंतु, स्वीडनच्या संसदेने १९८२ मध्ये हा अनुच्छेदच काढून टाकला, ज्यानुसार पुरुष धर्मगुरू महिलांना सहकार्य करण्यास नकार देऊ शकत होते. सन २००० मध्ये चर्चला राज्यापासून वेगळे केल्यानंतर महिलांना धार्मिक अभ्यासक्रमाच्या बाबतीत जास्त महत्त्व देण्यात आले. पुरुष धर्मगुरूंपेक्षा महिला धर्मगुरूंचे वेतन १८,००० रु. कमी आहे.
Powered By Sangraha 9.0