आपल्याला स्वप्ने का पडतात?

Sandyanand    13-Aug-2020
Total Views |
 
मनातील चिंता, भीती, तणाव, इच्छा-आकांक्षांचे हे असते रूप

jhabck_1  H x W
 
आपण सर्व जण स्वप्ने पाहत असतो. अनेक वर्षे संशोधन आणि विविध प्रयोग करूनही स्वप्न म्हणजे काय आणि ते का पडते याचा उलगडा अद्याप झालेला नाही. थोडी माहिती मिळाली असली, तरी ती सगळी तर्कांवर आधारलेली आहे. म्हणजे स्वप्नाचे गूढ कायम आहे. झोपेत असताना मनात येणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना, ताणतणाव, चिंता आणि इच्छा-आकांक्षांचे रूप म्हणजे स्वप्न, असे थोडक्यात सांगता येईल. मानसोपचारशास्त्राचे जनक मानल्या जाणाऱ्या सिग्मंड फ्रॉईड यांनी स्वप्नांबाबत बराच अभ्यास करून काही अंदाज केले. तथापि, स्वप्नाबाबत अजूनही ठाम स्वरूपात काही सांगता येत नाही...
 
संध्यानंद.कॉम
रोजच्या आयुष्यातील धावपळीच्या आपल्या दिवसात अनेक प्रसंगांना आपण सामोरे जात असतो. काही चांगले असतात तर काही वाईट. त्यातील काही काही घटना आपण त्या वेळी विसरून जात असलो, तरी मनात किंवा स्मृतीमध्ये त्या नोंदविल्या गेलेल्या असतात. रात्री झोपेत त्यांचे प्रकटीकरण होते. त्यालाच स्वप्न म्हणता येईल. आपल्या भावना, कल्पना, तणाव, चिंता, इच्छा-आकांक्षा स्वप्नांच्या रूपाने साकारत असतात. बहुतेक वेळा (पण हा नियम नाही) स्वप्ने झोपेच्या 'रॅपिड आय मूव्हमेंट' या अवस्थेत पडतात. मात्र सगळ्यांना याच अवस्थेत स्वप्ने पडतात असा नियम काही नाही. कोणाला केव्हा आणि कोणत्या वेळी स्वप्न पडेल हे ठामपणे सांगणे अशक्यच असते. मात्र, स्वप्ने पडत असताना आपला मेंदू पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. स्वप्ने पडतात हे नक्की; पण त्यांना काही अर्थ असतो का, स्वप्ने आपल्याला काही संकेत देत असतात का, कोणते स्वप्न चांगले आणि कोणते वाईट, हे प्रश्न गेली अनेक शतके आपल्यापुढे आहेत. स्वप्ने म्हणजे आपल्या मनात खोलवर रुजलेली भीती आणि इच्छा यांचे प्रतीक असल्याचे मानसोपचारशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉईड यांचे मत आहे. स्वप्न या विषयाने त्यांना एवढे आकर्षित केले होते, की त्यावर त्यांनी १८९९मध्ये 'इंटरप्रिटेशन ऑफ ड्रिम्स' या नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांच्या काळातील संकेत, खुणा व त्यांचा हेतू काय याचा ऊहापोह केला असून, काही मार्गदर्शक तत्त्वेही नमूद केली आहेत. त्याला 'फ्रुडियन स्वप्नमीमांसा' असे म्हणतात. सिग्मंड फ्रॉईड यांची मीमांसा सध्या प्रसिद्ध असली, तरी ती एकमेव नाही. काळ आणि संस्कृतीनुसार समजुतीसुद्धा बदलल्या आहेत. स्वप्नांचा संबंध मनाबरोबर असल्याने त्यात काटेकोर शास्त्रीय निकष उपयोगी पडत नाहीत. तरीही मानसिकतेवर करण्यात आलेल्या अभ्यासात स्वप्नांबाबत सात वस्तुस्थिती समजल्या आहेत. त्या पाहा.

jhabckdd_1  H x 
 
स्त्री-पुरुषांची स्वप्ने वेगळी -
 
स्त्री आणि पुरुषाच्या मानसिकतेमध्ये फरक असल्यामुळे दोघांनाही पडणाऱ्या स्वप्नांचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असल्याचे संशोधनात आढळले आहे. पुरुषांना पडणारी स्वप्ने अधिक आक्रमक आणि शारीरिक हालचालींची असल्याचे २००८मधील अभ्यासात दिसून आले. स्त्रियांना पडणारी स्वप्ने नकारात्मक आणि शारीरिक हालचाली कमी असणारी असतात. त्यांच्या स्वप्नांत संभाषणावर जास्त भर असल्याचे दिसून आले आहे. स्त्रियांच्या स्वप्नांचा कालावधीही जास्त असतो आणि त्यात ती जास्त व्यक्तींचा (कॅरेक्टर) समावेश असतो. यातही एक महत्त्वाची बाब म्हणजे, पुरुषांच्या स्वप्नांतील कॅरेक्टरमध्ये ६७ टक्के अन्य पुरुष असतात, तर महिलांच्या स्वप्नांतील ४८ टक्के कॅरेक्टर दुसऱ्या महिला असतात. असे का होते, याबाबत भिन्न मते आहेत. मोठे होत असताना स्त्री आणि पुरुष वेगवेगळ्या पद्धतीने विकसित होत असतात आणि त्याचा परिणाम स्वप्नांवर होतो, असे काहींच
 
हिंसक स्वप्ने देतात संकेत -
 
स्वप्ने कशी आणि कोणती पडतील हे सांगणे अशक्यच आहे. मात्र, हिंसक  स्वरूपाची स्वप्ने पडणे हा एक मानसिक आजार असतो. झोपेत किंचाळणे, लाथा झाडणे किंवा त्याप्रकारची अन्य कृती करणे म्हणजे मेंदूचा समतोल बिघडल्याची प्राथमिक लक्षणे असतात. कंपवात (पार्किन्सन्स) किंवा निद्रानाश ही त्याची कारणे असतात. 'रॅपिड आय मूव्हमेंट'च्या काळात (आरईएम) अशी लक्षणे दिसतात. संबंधित व्यक्तीच्या वर्तनानुसार त्याला अशी स्वप्ने पडू शकतात. संशोधकांनी २००६ ते २००९ या काळात केलेल्या अभ्यासात २७ रुग्णांमध्ये झोपविषयक तक्रारी दिसल्या. हिंसक  स्वप्ने पडणारे लोक काही वेळा स्वत:ला इजाही करून घेऊ शकतात. म्हणजेच अशी हिंसक स्वप्ने मेंदूतील बिघाडाचे संकेत देत असतात असे दिसते.