गणेश विसर्जनासाठी समुद्रात जाण्यास बंदी

Sandyanand    13-Aug-2020
Total Views |
 
dcsdf_1  H x W:
 
मुंबई महापालिकेचा निर्णय : कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी घातले निर्बंध
 
मुंबई, १२ ऑगस्ट (आ.प्र.) : कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेने यंदा समुद्रात गणेश विसर्जनावर निर्बंध घातले आहेत. अधिकाधिक भाविकांनी आपल्या परिसरातच मूर्तींचे विसर्जन करावे, यासाठी मुंबईत २४ विभागांमध्ये १६६ कृत्रिम तलाव उभारले जाणार आहेत. तसेच, घरगुती गणेश विसर्जनासाठी सोसायट्यांच्या आवारातही कृत्रिम तलावांना परवानगी दिली जाणार आहे. मुंबईत गिरगाव आणि दादर चौपाटीवर सार्वजनिक मंडळांच्या सर्वाधिक गणपतींचे विसर्जन होते. यंदा कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या उद्देशाने चौपाट्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दादर चौपाटीवरील सावरकर मार्गावर बॅरिकेड लावून समुद्राकडे जाणारा रस्ता बंद केला जाणार आहे. कुणी विसर्जनासाठी मूर्ती आणल्यास पालिकेचे कर्मचारी मूर्तीचे विसर्जन समुद्रात करतील. दादर, माहीम, धारावी या जी-उत्तर विभागात पूर्वी तीन कृत्रिम तलाव होते. यंदा सात करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. गिरगाव चौपाटीच्या विसर्जन नियमावलीबाबत लवकरच बैठक होणार असल्याची माहिती डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. विसर्जनाच्या दिवशी घरगुती गणपती असलेली इमारत किंवा चाळ सील केलेली असेल, तर विसर्जनासाठी मूर्ती बाहेर घेऊन जाण्यास परवानगी असणार नाही. मूर्तीचे विसर्जन बादलीत किंवा ड्रममध्ये करणे बंधनकारक राहील. त्या व्यतिरिक्त अन्य मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करता येतील. तसेच, मंडळांनाही मंडपातच किंवा कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटप, फुले व हार अर्पण करणे या बाबींना आळा घालावा, अशी सूचना पालिकेने केली आहे.