ऑनलाइन शाळेसाठी विद्यार्थी जातात रोज डोंगरावर

Sandyanand    13-Aug-2020
Total Views |
 
drgdgt_1  H x W
 
दक्षिण कन्नड जिल्ह्यात सिग्नलअभावी गैरसोय
 
शिबजे, १२ ऑगस्ट (वि.प्र.) : ऑनलाइन शाळेतील अभ्यासासाठी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील काही गावांतील विद्यार्थ्यांना डोंगरावर जावे लागत आहे. कारण या गावांमध्ये इंटरनेटचा सिग्नल मिळत नाही. कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. पण त्यासाठी उच्चदर्जाचे तंत्रज्ञान आवश्यक असते. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील काही गावांमध्ये सिग्नल मिळत नसल्याने तेथील विद्यार्थी रोज डोंगरावर जाऊन बसतात आणि तेथेच सिग्नल मिळत असल्याने त्यांना वर्चुअल धडे शिकता येतात. पेरला, बंदिहोळे, होसथोटा, बुद्दुडामक्की, शिबजे, बेलतंगडीसह अनेक गावांतील विद्यार्थ्यांना  इंटरनेट कनेक्शन मिळविण्यासाठी रोज डोंगर चढून उतरणे भाग पडत आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला पश्चिम घाट, उत्तरेला उडुपी जिल्हा आणि दक्षिणेला केरळ राज्य अशा या भागाच्या सीमा असून, हा दक्षिण कन्नडचा परिसर म्हणजे कर्नाटकचे शैक्षणिक केंद्र मानला जातो. यातील काही भाग मंगळुरू वन विभागात असून, बेलतंगडीसह नऊ भाग कुद्रेमुख वन विभागात येतात. त्यात पुन्हा सिद्धापूर हा उपविभाग आहे. हा भाग हरित वनांचा आहे आणि दऱ्यांमध्ये प्रख्यात शोला जंगल आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागामुळे येथील गावांत मोबाइलचे सिग्नल पुरेशा क्षमतेचे नसल्यामुळे संपर्कात अडचणी येतात. त्यावर मार्ग म्हणून या गावांतील विद्यार्थी रोज डोंगर चढून माथ्यावर जाऊन बसतात आणि ऑनलाइन शाळा संपल्यावर पुन्हा उतरून गावी येतात.