कोरोना प्रतिबंधासाठी 'मिशन झीरो' कार्यान्वित

13 Aug 2020 11:54:18


sdf_1  H x W: 0
 
नवी मुंबई पालिकेच्या उपक्रमाचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
 
नवी मुंबई, १२ ऑगस्ट (आ.प्र.) : कोरोनाबाधितांचा लवकरात लवकर शोध घेऊन कोरोनाची साखळी खंडित करण्यावर नवी मुंबई महापालिकेने भर दिला असून, यासाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सोसायटी, वसाहतींत नागरिकांच्या घरापर्यंत मोबाईल व्हॅनद्वारे अँटीजेन चाचण्यांची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, यामधून मृत्युदर कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. भारतीय जैन संघटनेच्या 'मिशन झीरो नवी मुंबई' उपक्रमाची सुरुवात शिंदे यांच्या हस्ते वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या आवारात करण्यात आली. खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, शासनाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी धर्मेशभाई जैन, विजय लखानी, राहुल नाहटा, राजुल व्होरा, शिल्पिन तातर, डॉ. विवेकानंद सावंत यांच्यासह महापालिका अधिकारी आणि मान्यवर या वेळी उपस्थित होते. बांगर यांनी 'अँटिजेन चाचण्या आपल्या घरापर्यंत' ही संकल्पना राबवण्यासाठी 'मोबाईल अँटिजेन टेस्ट व्हॅन' सुरु करण्याचे ठरवले. आयुक्तांच्या या संकल्पनेला भारतीय जैन संघटनेने सकारात्मक प्रतिसाद दिला. या उपक्रमास युनायटेड वे, क्रेडाई एमसीएचआय, देश अपनायें या संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत ६ प्रचाररथ तयार करण्यात आले असून, त्याद्वारे ठिकठिकाणी जनजागृतीही करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0