कोल्हापूर, सांगलीतील महापुराचा धोका टळला; महाराष्ट्र, कर्नाटकच्या मंत्र्यांची माहिती

Sandyanand    13-Aug-2020
Total Views |
 
sdsd_1  H x W:
 
कोल्हापूर, १२ ऑगस्ट (आ.प्र.) : कृष्णा-पंचगंगा नदीच्या महापुराबाबत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांत समन्वयामुळे नुकसान टळल्याची माहिती दोन्ही राज्यांतील मंत्र्यांनी नुकतीच येथे दिली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारेमंत्री रमेश जारकीहोळी यांनी शिरोळ तालुक्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटकमधील उपस्थित अधिकाऱ्यांसोबत बोरगाव येथे आढावा बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. महापुरामुळे दोन्ही राज्यांमधील गावांना व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागू नये, त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना या वेळी जारकीहोळी व यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. चार दिवस धरणक्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली भागात महापुराची परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. दोन्ही राज्यांकडून राखला जाणारा समन्वय यापुढे कायम ठेवला जाणार असल्याची ग्वाही या दोन्ही मंत्र्यांनी दिली.