कोरोना योद्ध्यांचा स्वातंत्र्यदिनी होणार सन्मान

Sandyanand    13-Aug-2020
Total Views |
 
sdsd_1  H x W:
 
मुंबई, १२ ऑगस्ट (आ.प्र.) : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर येत्या शनिवारी साजऱ्या होणाऱ्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी कोविड योद्ध्यांचा सन्मान केला जाणार आहे. यंदा विविध ठिकाणी होणाऱ्या ध्वजवंदनाच्या सोहळ्यासाठी प्रथमच सफाई कामगार, डॉक्टर, आरोग्य सेवकांसह कोरोनावर मात केलेल्या नागरिकांनाही निमंत्रित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साजरा होणार आहे. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्वांना मुखपट्ट्या बंधनकारक आहेत. राज्याचा मुख्य कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयाच्या प्रांगणात होणार असून, विभागीय आयुक्त, तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या वेळी सर्व ठिकाणी एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.५ वाजता शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहेत. या वेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देणारे सफाई कामगार, डॉक्टर, आरोग्यसेवक, तसेच कोरोनावर मात केलेले नागरिक अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला जाणार आहे. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले असून, स्वातंत्र्यदिनी संबंधित गावांत प्रशासकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे.