पनवेलमधील खासगी रुग्णालयांची डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडून तपासणी

Sandyanand    13-Aug-2020
Total Views |
 
asdasd_1  H x W
 
पनवेल, १२ ऑगस्ट (आ.प्र.) : खासगी कोविड रुग्णालयांतून कोरोनाबाधितांकडून जादा बिल वसूल केल्याच्या तक्रारी वाढत असतानाच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी पनवेल महापालिका हद्दीतील कोविड रुग्णालयांना अचानक भेट देत रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधला. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू असल्याचे या भेटीतून निष्पन्न झाले आहे. एकाही रुग्णालयाने शासनाने ठरवलेल्या दरपत्रकानुसार उपचार केले नसल्याचेही डॉ. शिंदे यांच्या या दौऱ्यातून उघड झाले. कोरोनाबाधितांवर उपचार करत असताना दरपत्रकाची यादी रुग्णालयातील दर्शनीय भागात लावणे गरजेचे असताना एकाही रुग्णालयाने ही यादी लावली नसल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. कळंबोलीतील सुश्रुत कोविड १९ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने जादा दरपत्रकाची यादी रुग्णालयात लावल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी ही यादी काढून टाकण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. राज्यभरात जादा बिल आकारणी करणाऱ्या खासगी कोविड रुग्णालयांना अचानक भेट देत डॉ. शिंदे आढावा घेत आहेत. पनवेलमधील भेट अशाच प्रकारची होती, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात पालिका आयुक्तांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. ज्या रुग्णांकडून जास्तीचे पैसे आकारले आहेत, ते त्यांना परत करण्यासंदर्भातील निर्णय या ऑडिट रिपोटनुसार घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.