बाभळी वृक्षाच्या काट्यानेच निघतो काटा...

Sandyanand    13-Aug-2020
Total Views |
 
sdfsdf_1  H x W
 
बाभळीची पाने गळाली तरी काट्यांमुळे सावली राहते. याचा काटा फारच टोकदार असतो. याच काटा रुतला तर बाभळीच्याच काट्याने तो काढता येतो. काट्याने काटा काढणे ही म्हण यावरूनच प्रचलित झाली. बाभुळ ओसाड जागेवर वाढते. याची वाढ कोरड्या हवेत होते. याला पिवळी गोल फुले येतात. काही भागात एप्रिल महिन्यात हे झाड पिवळ्या फुलांनी भरून जाते. जाळण्याकरिता व इमारतीकरिता याच्या लाकडाचा उपयोग होतो. याचे लाकूड सागवानापेक्षा दुप्पट टणक असते. लाकडाचा उपयोग घरबांधणी, शेती अवजारे, फर्निचर इत्यादीसाठी केला जातो. या झाडाचा उपयोग जनावरांसाठी खाद्य, टॅनिन निर्मिती, औषधी म्हणून, लाख किडे वाढविण्यासाठी याच्या डिंकाचा उपयोग होतो. कमी पाण्यात जास्त तापमानात तग धरून वाढत असल्यामुळे दुष्काळी प्रदेशात या झाडाची लागवड चांगली होऊ शकते. बाभुळ डिंक पौष्टिक असल्याने डिंकाचे लाडू केले जातात. बाभळीच्या कोवळ्या खोडाने दात घासल्यास दंतरोगमु्नती होते. व हिरड्या घट्ट होतात. याच्या सालीच्या काढ्याने गुळण्या केल्यास तोंडाचे विकार दूर होतात. जुलाब, अतिसार, मधुमेह या विकारात सालीचा उपयोग केला जातो. बाभूळ वृक्षाची रोपे बियांपासून तयार केली जातात. याचे लाकूड इंधनाचे उत्तम साधन आहे. याची हळुवार जळण्याची क्षमता, धूर कमी होतो या सर्व कारणांमुळे हे लाकूड इंधनासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. शेताच्या कडेने कुंपणासाठी बाभळीची झाडे लावली जातात. या वृक्षाची साल काळसर असते. त्यात १२ ते २० टक्के टॅनिन असते. कातडी उद्योगात या टॅनिनला मोठ्याप्रमाणात मागणी आहे.