मरा-भाईंदरला कोरोनाग्रस्तांसाठी हेल्पलाइन महापालिकेची सुविधा कार्यान्वित

Sandyanand    12-Aug-2020
Total Views |
 
rrrr_1  H x W:
 
भाईंदर, ११ ऑगस्ट (आ.प्र.) : मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पालिका प्रशासन विविध उपाययोजना करत असून, पालिका प्रशासनाने कोरोनाबाधितांसाठी हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, रुग्णांनी या हेल्पलाइनचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. महापालिका क्षेत्रातील डीसीएचसी, डीसीएच दर्जा प्राप्त रुग्णालयांतील खाटांची माहिती नागरिकांना डॅशबोर्डद्वारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डॅशबोर्डमार्फत  डीसीएचसी, डीसीएच रुग्णालयातील खाटा ऑनलाइन व दूरध्वनीद्वारे आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेत वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ०२२-२८१४१५१६ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. वॉर रूममध्ये प्रत्येकी चार तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू तीन शिफ्टमध्ये रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत. वॉर रूममार्फत पालिका क्षेत्रातील डीसीएचसी, डीसीएच रुग्णालयातील खाटांचे आरक्षण होते. तसेच, रुग्णांना सेवेसाठी मागणीप्रमाणे रुग्णवाहिका व शववाहिनी उपलब्ध करून देण्यात येते. वॉर रूममार्फत रुग्णांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येते. वॉर रूम सुरू झाल्यापासून आजपर्यंत २४७ रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले असून, ८५ खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी १८ खाटा ऑनलाइन आरक्षित करण्यात आल्या असून, ६७ खाटा हेल्पलाइनद्वारे आरक्षित करण्यात आले आहेत. १५ रुग्णांना रुग्णवाहिका, तर एका रुग्णाच्या नातेवाइकांना शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढ्यात महापालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी. कोरोनाबाधितांनी पालिकेच्या हेल्पलाइनचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.