भिवंडीत फिरत्या पथकाद्वारे अँटिजेन चाचण्या

Sandyanand    12-Aug-2020
Total Views |
 
xxxxx_1  H x W:
 
महापालिके तर्फे  दाटीवाटीच्या ठिकाणी होणार तपासणी
 
भिवंडी, ११ ऑगस्ट (आ.प्र.) : रुग्णालयांत, तसेच कोरोना केंद्रांत जाऊन अँटिजेन चाचणी करण्यास भिवंडीकरांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याने अखेर शहरातील दाटीवाटीच्या ठिकाणी, महत्त्वाचे चौक, बाजारपेठ परिसर, भाजी बाजारात जाऊन फिरत्या तपासणी पथकांद्वारे अँटिजेन चाचण्या करण्याचा निर्णय भिवंडी महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही तपासणी मोहीम सुरू झाली असून, पहिल्या दिवशी २६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. भिवंडी शहर कोरोनामुक्त करण्यासाठी महापालिकेने अँटिजेन चाचण्या करण्यावरही अधिक भर दिला असून, येथील इंदिरा गांधी रुग्णालय आणि अन्य कोरोना केंद्रांमध्ये या चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र, येथे येऊन स्वतःची चाचणी करून घेण्यास नागरिक प्रतिसाद देत नसल्याने जास्तीत जात चाचण्या होण्यासाठी पालिका प्रशासनानेच पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने फिरत्या तपासणी पथकांद्वारे अँटिजेन तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली. रुग्णवाहिका, तसेच मोबाइल व्हॅनमध्ये वैद्यकीय पथक कार्यरत असून, प्रभाग समितीनिहाय गर्दीच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली जात आहे. या मोहिमेला प्रारंभ झाला असून, पहिल्या दिवशी ओसवाल वाडी, नवी वस्ती, शांतीनगर भाजी मार्केट, ३, ४, ५ या प्रभाग समितीच्या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे भिवंडी शहर कोरोनामुक्त होण्यास मदत होणार आहे. सतत खोकला, ताप, घशात खवखव होत असल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा कोविड केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.