राज्यातील ऊर्जा कंपन्या २० हजार कोटींचे कर्ज उभारणार

Sandyanand    01-Aug-2020
Total Views |
 
ecty1_1  H x W: 
 
मुंबई, ३१ जुलै (वि.प्र.) : आर्थिक समस्येबरोबर झुंजणाऱ्या राज्यातील ऊर्जानिर्मिती कंपन्या आता वीस हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारणार आहेत. मासिक खर्च भागविणे, रोख रकमेची चणचण कमी करणे आणि सध्या सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ही रक्कम वापरली जाईल. या कर्जाला हमी देण्याचा, तसेच त्यासाठी फी न आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एमएसइबी होल्डिंग कंपनी, महाजेनको, महावितरण आणि महाट्रान्स्को या कंपन्या हे कर्ज घेणार आहेत. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ (एनटीपीसी), पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रूरल इलेक्ट्रीफिकेशन कॉर्पोरेशन किंवा बँक अथवा अन्य वित्तीय संस्थांकडून हे कर्ज घेण्यात येणार आहे. कर्ज घेण्याचे नियम आणि अटी निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांची एक समिती यासाठी नियुक्त करण्यात आल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक घडामोडी थांबल्यामुळे विजेची मागणी रोजच्या २३ हजार मेगावॉटवरून १६ हजार मेगावॉटपर्यंत खाली आली. पण याकाळात अखंड वीजपुरवठ्यासाठी महाजेनको, महावितरण आणि महाट्रान्सको या कंपन्यांना प्रयत्न करावे लागले. महाराष्ट्र विद्युत नियंत्रण आयोगाच्या सूचनेनुसार उद्योग आणि व्यापारी संस्थांना सवलती द्याव्या लागल्या. सध्या महसूल पुरेसा मिळत नसल्याने या कंपन्यांपुढे आर्थिक अडचण निर्माण झाल्याचे राज्य ऊर्जा विभागाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. विजेचे वितरण करणाऱ्या महावितरण कंपनीपुढे आर्थिक अडचणी असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नुकतेच सांगितले होते. एप्रिल आणि मे या महिन्यांत लॉकडाऊनमुळे कारखाने आणि व्यापारी संस्था बंद राहिल्याने ही स्थिती आल्याचे ते म्हणाले होते. महसुलाचे प्रमाण कमी झाले असले तरी कर्मचाऱ्यांचे वेतन, विजेची खरेदी आणि करांचे दायित्व हे खर्च सुरूच आहेत. त्यामुळे महावितरणसमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. महावितरणसमोरची ही समस्या सोडविण्यासाठी या कंपनीला दहा हजार कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणीसुद्धा राऊत यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंह यांच्याकडे केली आहे .