आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीच्या समावेशासाठी राज्य सरकारकडून टास्क फोर्स
'कोव्हिड-१९'चा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय शाखेतील सर्व उपचारपद्धती वापरून पाहण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच यासंदर्भात डॉ्नटरांची बैठक घेऊन 'कोव्हिड-१९' टास्क फोर्सकडे सूचना देण्यास सांगण्यात आले. वैद्यकीय शाखेतील होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी उपचारपद्धतींची सांगड घालून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या शाखांच्या डॉ्नटरांच्या बैठकीत याबाबतच्या सूचना 'कोव्हिड-१९' टास्क फोर्सकडे देण्यास सांगण्यात आले. हा टास्क फोर्स राज्य सरकारने नियुक्त केला असून, त्याच्या सूचनेप्रमाणे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. 'आयुष'च्या सूचनेनुसार प्रतिबंधात्मक उपायांसाठीसुद्धा एक समिती नेमण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
कोरोनाच्या सर्व लक्षणांवर काय उपचार करता येतील याचे निकष तयार करण्याचा आदेशही त्यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला दिला आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीचे महत्त्व जगाला पटवून देण्याची संधी आली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रतिबंध आणि उपचार अशा दोन गटांत 'आयुष'च्या औषधांची वर्गवारी करण्याची सूचना तज्ज्ञांनी केली आहे. 'कोव्हिड-१९'वर उपचार करताना वापरल्या जाणाऱ्या प्लाझ्मा उपचारांत फसवणूक होत असल्याच्या तक्रारींची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली असून, लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 'कोव्हिड- १९'च्या रुग्णांवर उपचारांसाठी प्लाझ्मा पद्धत योग्य ठरत असून, त्याचे निकाल उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनी प्लाझ्माचे दान करावे म्हणून काही रुग्णालयांनी मोहिमा सुरू केल्या आहेत. मात्र त्याचा गैरफायदा घेऊन काही समाजकंटक लोकांची फसवणूक करत असल्याचे ते म्हणाले. अशा समाजकंटकांविरुद्ध कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.