नवी मुंबईत रोज तेराशेपेक्षा जास्त चाचण्या

Sandyanand    31-Jul-2020
Total Views |

corona _1  H x  
 
 
महापालिकेने दिला वेग : अँटिजेन चाचणी केंद्रांची संख्याही वाढवणार
 
 
नवी मुंबईत कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली असून, रोज सरासरी १३०० चाचण्या केल्या जात आहेत. त्यात अँटिजेन चाचण्यांची भर पडली असून, चाचण्याची एकूण संख्याही दोन हजारपर्यंत गेली आहे. येत्या काळात अधिकाधिक अँटिजेन चाचणी केंद्रे सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शीघ्र तपासणी, अलगीकरण आणि उपचार या त्रिसूत्रीच्या आधारावर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोना नियंत्रणासाठी 'मिशन ब्रेक द चेन' घोषित केले आहे. अर्ध्या तासात तपासणी अहवाल प्राप्त होणाऱ्या अँटिजेन चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ४० हजार अँटिजेन चाचण्यांचा संच पालिकेकडे सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काळात जास्तीत जास्त केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
 
बाधित आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तीच्या  शोध, त्यांच्यात कोरोनासदृश लक्षणे असलेल्या प्रत्येकाची अँटिजेन चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाशी सेक्टर-१० मधील पालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात अँटिजेन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले. सध्या शहरात १६ हून अधिक अँटिजेन चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही संख्या आणखी वाढवण्याचे नियोजन पालिका प्रशासन करते आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील घटकांच्या अँटिजेन चाचण्यांसह शहर पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने तीन दिवसांत १८५२ पोलिसांच्या अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ७४ पोलिस बाधित आढळले आहेत. नवी मुंबईत रोज ४०० ते ५०० चाचण्या करण्यात येत होत्या. ही संख्या प्रतिदिन १३०० एवढी झाली आहे. तरीही कमी कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्यांचे लक्ष्य निश्चित करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त बांगर यांनी दिली.