भिवंडीतील कोरोना रुग्णालयाची मान्यता रद्द

Sandyanand    31-Jul-2020
Total Views |
 
ty_1  H x W: 0
रुग्णालयाची नोंदणीही तात्पुरती स्थगित
 
कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी भिवंडीतील वराळादेवी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक, तसेच फिजिशियन उपलब्ध नसणे, चालू महिन्यात मृत्युदर अधिक असणे, आयसीएमआरच्या आदेशानुसार रुग्णांवर उपचार न होणे आदी गंभीर गोष्टींची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी तूर्तास या रुग्णालयात नवे रुग्ण दाखल करून घेण्यास मनाई केली. तसेच, कोरोना रुग्णालय म्हणून दिलेली मान्यताही रद्द केली असून, रुग्णालयाची नोंदणी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. भिवंडीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, सध्या ५१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. कामतघर येथील वराळादेवी रुग्णालय कोरोना समर्पित रुग्णालय असले, तरी या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपलब्ध नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. रुग्णालयात फिजिशियनही नाहीत. नुकत्याच झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत ही बाब निदर्शनास आली. या बैठकीत शहरातील सर्व कोरोना रुग्णालयांतील मृत्यूंची कारणमीमांसा करण्यात येते. त्यात वराळादेवी रुग्णालयात जुलैत मृत्युदर जास्त असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्त डॉ. आशिया यांनी नवीन रुग्ण दाखल करून घेण्यास या रुग्णालयाला मनाई केली. रुग्णालयाची कोरोना रुग्णालय म्हणून असलेली मान्यताही रद्द केली. सध्या असलेले रुग्ण तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. वराळादेवी रुग्णालयाला कोरोना रुग्णालय म्हणून मान्यता देणारे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नोटीस देण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.