एसटीच्या पंपांवर सीएनजीची किरकोळ विक्री

31 Jul 2020 13:16:34

bh_1  H x W: 0  
 
 
परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती : उत्पन्नवाढीसाठी संचालक मंडळाचा निर्णय
 
 
मर्यादित इंधन पंपांमुळे सीएनजी आणि एलएनजी भरण्यासाठी वाहनधारकांना लांबच लांब रांगेत अडकावे लागत होते. मात्र, आता या रांगेतून लवकरच त्यांची सुटका होणार आहे. राज्यातील ३० ठिकाणी किरकोळ इंधन विक्री सुरू करण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना एसटीच्या इंधन पंपावर आता पेट्रोल-डिझेल, सीएनजीएलएनजी खरेदी करता येणार आहे. परिवहनमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. लॉकडाउन काळात झालेले नुकसान भरून काढणे आणि महामंडळाच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी विविध योजनांवर काम सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अँड. परब यांनी सांगितले.
 
एसटी पंपावर विक्री केंद्र उभारण्यासाठी इंडियन ऑइल कंपनीसोबत करार करण्यात येणार आहे. महामंडळाच्या विभागीय कार्यालयानुसार किरकोळ इंधन विक्रीसाठी बीडमध्ये चार केंद्रे, तर नाशिकमध्ये तीन केंद्रे उभारण्यात येतील. पालघर, जळगाव, बुलडाणा, रत्नागिरी, अकोला, वर्धा आणि सोलापूर या ठिकाणी प्रत्येकी दोन आणि पुणे, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, अहमदनगर, सातारा, धुळे आणि जालन्यात प्रत्येकी एक केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाची जागा भाडेतत्त्वावर देऊन काही ठिकाणी नव्याने केंद्राची उभारणी, तर काही केंद्रांची पुनर्बांधणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात पेट्रोल व डिझेल विक्री सुरू होईल. त्यानंतर लगोलग सीएनजी आणि शेवटच्या टप्प्यात एलएनजी विक्री सुरू करण्यात येईल. या सर्व केंद्रांवर वाहनधारकांना इंधन भरण्याची मुभा असेल, असे एसटीकडून सांगण्यात आले. दरम्यान, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे एलएनजी आणि सीएनजी या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांत रूपांतर करण्यासाठी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यास एसटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कंपन्यांचे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर ते तातडीने मंजूर करून कामे जलदगतीने ते पूर्ण करण्यात येणार असल्याचेही एसटीकडून सांगण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0