काही प्रसंगांमध्ये मौन पाळणेच लाभदायक ठरते.

Sandyanand    30-Jul-2020
Total Views |
 
4_1  H x W: 0 x
 
कोणत्याही गोष्टींसाठी मागितल्याशिवाय सल्ला देणे प्रत्येकाने टाळले पाहिजे.
 
खासगी गोष्टी चारचौघात बोलत असताना सावधपणा असायला हवा.
 
ऑफिसमध्ये घडणाऱ्या घटनांवर घरात चर्चा करता कामा नये.
 
बोलणे ही माणसाची ओळख आहे. बोलण्यातून संवाद साधला जातो. पण, काही प्रसंगांमध्ये न बोलणे, मौन पाळणे लाभदायक ठरते. कोणत्या प्रसंगांमध्ये गप्प राहायचे हे प्रत्येक व्यक्तीने अनुभवातून शिकून घ्यायचे असते. आयुष्यातील आनंदासाठी मौन पाळता येणे ही आवश्यक बाब ठरते.
 
मनातली गोष्ट मोकळेपणाने बोलणे चांगले असते. पण, तसे प्रत्येक स्थितीत शक्य  होतेच असे नाही. मागितला नसताना कुणाला सल्ला देणे, किंवा दुसऱ्यांच्या गोष्टी स्वत:पुरत्याच न ठेवता इतरांना सांगणे, तुमचे व्यक्तिमत्व  आणि तुमच्या जवळच्या व्य्नतींवर परिणाम करू शकतो. काही उदाहरणांवरून ही गोष्ट समजणे सोपे ठरेल. जर दोन जणांमध्ये कोणत्या गोष्टीवर चर्चा होत असेल, तर त्यांनी मागितल्याशिवाय आपला सल्ला देणे गरजेचे नाही. आपल्या मनानेच योग्य- अयोग्य ठरवून बाजू घेणेही योग्य नाही. जर कोणी तुमचे मत मागत असतील, तर मग अवश्य ते सांगा. मात्र, कोणी विचारले नसताना मत देऊ नका. त्याचा वाईट परिणाम होतो. नकळत का होईना पण दुसऱ्यांविषयी गोष्टी अन्य लोकांना सांगणे आपण टाळले पाहिजे. उदाहरण म्हणून जर कोणाच्या घरी गेलात आणि काही त्रुटी आढळल्या तर, किंवा तुमच्या उपस्थितीत त्यांच्या खासगी गोष्टी समोर येतील, तर त्यांना तुमच्या जवळच्या लोकांना किंवा मित्रांना सांगू नका. तसेच कोणी अन्य व्यक्ती  तुमच्याजवळ एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या  खासगी जीवनाविषयी बोलत असेल, तर त्याला तिथेच थांबवा.
 
सर्वसाधारणपणे मित्र किंवा परिचिताच्या घरी गेल्यानंतर ते आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी तक्रार करत असतील, त्या आई-वडिलांच्याबरोबर मुलांचे दोष हुडकण्याऐवजी तुम्ही शांत राहणे चांगले ठरेल. मुलगा कोणत्या परिस्थितीमुळे अभ्यासात मागे राहिला, हे तुम्ही जाणत नाहीत. आणि तुम्ही तेव्हा उपस्थितही नव्हता. अशावेळी त्यांचे म्हणणे ऐका, मुलांचे दोष काढू नका. आणि तुमचे स्वत:चे उदाहरणही देऊ नका. कोणत्याही गोष्टींसाठी मागितल्याशिवाय सल्ला देणे प्रत्येकाने टाळले पाहिजे सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, लोक ऑफिसमध्ये झालेल्या लहानशा संभाषणांची चर्चा लोक घरी करतात. अशा वेळी परिवारातील सदस्यांच्या मनात त्या व्यक्तीविषयी  कटुता निर्माण होते. तुमच्याविषयी त्यांची चिंता वाढते ते वेगळेच. कदाचित काही दिवसांनी तुमच्या आणि सहकाऱ्याच्या संबंधांमध्ये सुधारणा होईल. पण, तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या  मनात त्या व्यक्तीबाबत  तीच भावना आणि नकारात्मक प्रतिमा राहील, जी आधी होती. तुमचे संभाषण सामान्य असू शकते. पण, त्या व्यक्तीबाबतची कुटुंबाची प्रतिमा पुन्हा सुधारणार नाही. अशा वेळेस जोपर्यंत  काही मोठी गोष्ट नसेल तोपर्यंत  तिला ऑफिसमध्येच राहू द्यावे, घरी आणू नका.
 
खासगी गोष्टी सार्वजनिक करू नका
मुलीच्या लग्नानंतर तिला सासरच्या गोष्टींना माहेरी न सांगण्याचा सल्ला दिला जातो. तो योग्यच असतो. सर्वसाधारणपणे मुली लहान-लहान गोष्टी आपल्या माहेरी सांगतात. त्यामुळे आई-वडिलांच्या मनात तिच्या संसाराबाबत चिंता निर्माण होते. तिच्या सासरच्यांबाबतची प्रतिमा बदलते. त्यामुळे नाती बिघडू शकतात. यामुळे मुलगी माहेरी आली असताना तिच्या सासरच्या लोकांबद्दल किती बोलायचे याचे भान ठेवले पाहिजे. शक्यतो  मुलीच्या सासरच्या लोकांबद्दल कोणत्याही बाबतीत इंटरफेअर करणे योग्य नाही. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा येण्याची शक्यता  नाकारता येत नाही.
 
अरेरे, बोललो नसतो तर... असे अनेक वेळा होते की, आम्ही एखादी खासगी माहिती बोलण्याच्या ओघात अनोळखी किंवा अल्पपरिचितांना सांगतो. नंतर वाईट वाटते की, अरेरे, असे केले नसते तर चांगले झाले असते. हे वाईट वाटणे, थोडे बोलणे किंवा गप्प बसण्यामुळे दूर होऊ शकते.