सेलिब्रिटी टॉक्स : मिथुन चक्रवर्ती

Sandyanand    30-Jul-2020
Total Views |

meeting_1  H x  
 
माझा जन्म कोलकाता येथे झाला. मी तिथेच शिकलो. पण, वयाच्या १९ व्या वर्षी काही राजकीय पाश्र्वभूमी असल्यामुळे आणि काही अपरिहार्य कारणामुळे मला कोलकाता सोडावं लागलं. मी मुंबईत पोहोचलो पण, मी परत कोलकात्याला जाऊ शकलो नाही. म्हणूनच मी म्हणतो की मी महत्त्वाकांक्षा ठेवून अभिनेता झालेलो नाही. इंग्रजीत सांगायचं तर (नॉट बाय अ‍ॅम्बिशन बट बाय कम्पल्शन). माझे काही मित्र मला पुण्यामध्ये फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन गेले. तिथे असं कळलं की तिथे अभिनेत्यांना प्रशिक्षण दिलं जातं. मी अर्ज दिला वगैरे. पण, हे सगळं ऐकणं, वाचणं हे जितकं सोपं वाटतं तितकं सहजसोपं असं माझ्या आयुष्यात काहीही घडलेलं नाही. एका रात्रीत मला काहीच मिळालं नाही.
 
फार छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला आहे. मी काही पारंपरिक पद्धतीचा हिरो नाही. माझा रंग वगैरे पाहून तर कोणालाही तसं वाटणार नाही. त्यामुळे मी हिरो होण्याचा विचार कधी केला नव्हता. वाटलं होतं, की खलनायकाची भूमिका करु शकू आणि तेही बॉलिवूडमध्ये नाही तर बंगाली चित्रपटांमध्ये. पण, नियती ही काहीतरी वेगळेच खेळ दाखवत असते. तसंच माझ्याही बाबतीत घडलं. मृणाल सेन यांनी 'मृगया' हा चित्रपट हिंदीमध्ये तयार केला आणि माझा प्रवासच राष्ट्रीय पुरस्काराने सुरू झाला. खरंतर त्यानंतर संघर्ष आणखीच वाढला कारण लोक म्हणू लागले की अरे हा अभिनेता तर चांगला आहे, पण, तो हिरो वाटत नाही. थोडक्यात सांगायचं तर मी हरणारा माणूस नाही. मी पराभूत झालो तरीही हे लक्षात घ्या, की मी पौरस असतो. सिकंदर आणि पौरस यांच्यातील लढाईसारखाच मी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करून, लढाई करूनच मी पराभूत होईन.