महिलांसाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची

Sandyanand    25-Jul-2020
Total Views |

abc_1  H x W: 0 
 
 
 
कमाईचा कालावधी कमी असल्याने महिलांनी जास्त बचत करावी
 
विविध पर्यायांमध्ये  काळजीपूर्वक गुंतवणूक करायला हवी
 
आयुर्मानात झालेल्या वाढीमुळे आर्थिक सक्षमता हवीच
 
महिला कमावत्या झाल्या असल्या तरी आर्थिक आघाडीवर त्यांना पुरेशी माहिती नसल्याचे दिसते. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत प्रत्येक रुपया मोलाचा आहे आणि म्हणूनच आर्थिक साक्षरता महिलांसाठी महत्त्वाची आहे. कष्टातून मिळविलेल्या पैशाची योग्य गुंतवणूकसुद्धा फार महत्त्वाची असते. कधी काय स्थिती येईल हे सांगता येत नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणे केव्हाही चांगलेच. काय करता येईल त्यासाठी?
 
पैशाभोवती दुनिया फिरते असे म्हणतात आणि ते सत्य आहे. आजच्या काळात तर पैशाविना एक पाऊलही टाकता येत नाही. महिला शिकू लागल्या, नोकरी किंवा स्वत:चे उद्योग सुरू करू लागल्या. त्यातून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या ही फार चांगली घटना आहे. सामाजिक बदलांमुळे कमावत्या महिलेचा तिच्या पैशावर पूर्ण हक्क असतो. त्यातून ती गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकते. संगणक आणि इंटरनेटच्या या काळात अनेक प्रकारची माहिती ऑनलाइन उपलब्ध असते. पण आजही घरातील पैशाचे व्यवस्थापन सहसा पुरुष करत असल्याचे दिसते. पण महिलांनीसुद्धा त्यात सहभाग घेणे आवश्यक आहे. भविष्यात काही कडवट प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ आली, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे महिलांना अत्यावश्यक आहे. त्यासाठी त्यांनी आर्थिक बाबींमध्ये लक्ष घालायला हवे. माता असो, घटस्फोटिता असो किंवा विधवा असो; स्त्रियांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आर्थिक स्वावलंबन गरजेचे आहे. स्त्रियांच्या आर्थिक प्रगतीत वेतनाबाबतचा भेद, मूल वाढविण्यासाठी घ्यावा लागणारा करिअर ब्रेक आणि दीर्घायुष्य हे तीन अडथळे आहेत.
 
सध्याच्या काळात आयुर्मर्यादा  वाढली आहे. महिलांचे सध्याचे सरासरी आयुर्मान ७८.६ वर्षांचे आहे, तर पुरुषांचे ७७.२ वर्षांचे आहे. म्हणजे, दीर्घायुष्यामुळे स्त्रियांच्या आर्थिक गरजाही जास्त आहेत. २०११च्या गणनेनुसार एकट्या राहणाऱ्या महिलांची संख्या भारतात सुमारे सात कोटी ४० लाख होती. याचाच अर्थ, आर्थिक साक्षरता शिकणे ही महिलांची मोठी गरज आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा सुरू असल्या, तरी वेतन देताना स्त्रियांबाबत लिंगभेद होत असल्याचे (जेंडर पे गॅप) २०१९च्या ममॉन्स्टर सॅलरी इंडे्नस रिपोटफमधून स्पष्ट झाले आहे. भारतातील महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा १९ टक्के कमी वेतन मिळते. २०१८मध्ये मध्यम पातळीवर काम करणाऱ्या पुरुषांची दर तासाची सरासरी कमाई २४२.४९ रुपये, तर महिलांची कमाई १९६ रुपये होती. उच्च पातळीवर हा फरक ४५ टक्के होता, तर प्राथमिक स्तरावर २० ते ३५ टक्के होता, असे 'रॅनस्टॅड इंडिया'मधील एक अधिकारी अंजली सूर्यवंशी यांनी सांगितले. म्हणजे, तेच काम, तेवढेच कौशल्य आणि तेवढाच अनुभव असूनही पुरुषांची कमाई महिलांपेक्षा जास्त असते. पण तुम्ही पुरुष सहकाऱ्याएवढेच आणि तेवढ्याच कौशल्याने काम करत असाल, तर समान वेतन किंवा काही जास्त रिवॉड मागण्यात संकोच करू नका, असे तज्ज्ञ सांगतात. समाजात अद्यापही काळजी घेण्याचे काम स्त्रियांवर सोपविले जाते. मूल वाढविणे असो किंवा आजारी पालकांचा सांभाळ करणे असो; कामातून करिअर ब्रेक आधी महिलेलाच घ्यावा लागतो. या ब्रेकमुळे स्त्रीच्या करिअरमध्ये अडथळा येतो आणि कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) तसेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे (पीपीएफ) तिला मिळणारे फायदेही कमी होतात, असे 'पिकअल्फा इन्व्हेस्टमेंट्स'च्या संचालिका प्रिया सुंदर यांनी नमूद केले.करिअर ब्रेकमुळे वेतनात चढ-उतार होत असल्यामुळे गुंतवणूकही थांबते, असे त्यांनी सांगितले.
 
नेटवर्क कायम ठेवा - जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी करिअर ब्रेक घ्यावा लागला, तरी तुमच्या सहकाऱ्यांबरोबरचे नेटवर्क कायम ठेवा. दोन-तीन वर्षांच्या ब्रेकनंतर कदाचित त्याच कंपनीत नोकरी मिळणार नाही; पण त्या वेळी तुमचे सहकारी, मित्र-मैत्रिणी उपयोगी पडतील. त्यांच्या मदतीमुळे तुम्हाला दुसरी नोकरी मिळविता येईल, असा सल्ला मटीम लिज सव्र्हिसेसफच्या उपाध्यक्ष नीती शर्मा देतात. सध्याच्या काळात वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करण्यावर अंजली सूङ्र्मवंशी भर देतात. त्या म्हणतात, की गरोदरपणाच्या सहा महिन्यांच्या रजेवरून कामावर पुन्हा रुजू झालेल्या महिलेला पुन्हा तेच काम मिळेल याची खात्री नसल्यामुळे दुसरे कौशल्य शिकणे गरजेचे आहे. पुरुषांपेक्षा वेतन कमी मिळण्याबरोबरच गरोदरपण आणि अन्य जबाबदाऱ्यांमुळे स्त्रियांकडे आर्थिक कमाईचा कालावधी पुरुषांपेक्षा कमी असतो. म्हणजे त्यांना कमी काळ नोकरी करता येते. साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या बचतीवर होतो. यावर उपाय म्हणजे मासिक बचतीच्या रकमेत वाढ करून तोल साधणे. ते कसे करता येईल याचे एक उदाहरण घेऊ. २५ वर्षांच्या एका महिलेला वयाच्या साठीनंतर लागणाऱ्या खर्चाची तरतूद करावयाची असेल, तर तिला तिच्या वेतनाच्या १७ टक्के रक्कम बचतीत गुंतवावी लागेल. हेच प्रमाण पुरुषाच्या बाबतीत दहा टक्के असेल. एवढ्या रकमेची बचत करणे शक्य नसेल, तर 'ईपीएफ' किंवा मव्हीपीएफफमधील रकमेची टक्केवारी वाढविता येईल. म्हणजे खर्चापूर्वीच तिच्या पैशाची बचत होईल. पुरुष काय आणि स्त्री काय; दोघांच्याही गुंतवणुकीत काही फरक नसला, तरी आर्थिक कमाईचा कालावधी कमी असल्यामुळे उपलब्ध काळात गुंतवणुकीतून जास्तीत जास्त फायदा मिळवायला स्त्रियांनी शिकले पाहिजे. निवृत्ती किंवा मुलांचे शिक्षण यासारख्या सध्या लगेच नसणाऱ्या खर्चांची तरतूद आतापासूनच करायला हवी. अशा वेळी इक्विटीमध्ये केलेली गुंतवणूक चांगला परतावा मिळवून देऊ शकते. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून तुम्ही गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांची  चाचपणी करून त्यातही काही रक्कम ठेवणे चांगले. महिलांजवळ नोकरीचा काळ कमी असल्यामुळे नवे कौशल्य शिकून त्या नोकरीचा काळ वाढवू शकतात. त्यामुळे त्यांची आर्थिक आवक कायम राहील.
 
आर्थिक नियोजन महत्त्वाचे - महिलांसाठी सर्वांत महत्त्वाचे आहे हे आर्थिक नियोजन. नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी निवृत्तीची तरतूद सुरू करायला हवी. त्यासाठी इक्विटी फंड आणि डेट इन्स्ट्रुमेंट्सचा आधार घ्या. समजा तुमचे वय ३० वर्षे असेल, तर तुमच्या बचतीचा किमान ७० टक्के भाग इक्विटीमध्ये आणि ३० टक्के भाग कर्जरोख्यांमध्ये (डेट) ठेवा. पहिल्यातील गुंतवणूक इक्विटी फंडस्च्या स्वरूपात असेल, तर दुसऱ्या पर्याय  'ईपीएफ', 'व्हीपीएफ', 'पीपीएफ' आणि 'एनपीएस'चा समावेश असावा. विम्यातील गुंतवणूकही महत्त्वाची आहे. तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी टर्म लाइफ आणि हेल्थ इन्शुरन्स घ्यायला हवे. आरोग्यासाठी तुमचा जोडीदार आणि मुलांसाठी पाच ते दहा लाख रुपयांचा फॅमेली फ्लोटर प्लॅन घ्या, पण तुमच्या पालकांसाठी वेगळा प्लॅन घ्या. गंभीर आजारांवर उपचारांसाठी तुम्ही आणि जोडीदारासाठी २५ ते ३० लाखांचा क्रिटिकल इलनेस प्लॅन घेणे विसरू नका. तुमच्या पालकांचे उत्पन्न पुरेसे नसेल तर साहजिकच तुम्हाला त्यांना मदत करावी लागेल आणि त्यात तुमची बचत काही होणार नाही किंवा तुमच्या योजना गुंडाळून ठेवाव्या लागतील. अशा वेळी काय करावे? प्रिया सुंदर सांगतात, मपालकांजवळ पैसा नाही ही क्वचितच घडणारी घटना आहे. त्यांच्याकडे मालमत्ता किंवा सोन्याच्या रूपात पैसा असतोच. त्याचे रूपांतर रोख रकमेत करायला हवे. त्यामुळे पालकांजवळ पैसा येईल आणि तुमच्यावरील आर्थिक बोजा कमी होईल. तुमच्या पालकांचे पैसे योग्य पर्यायांत गुंतवावेत आणि त्यातून फायदा मिळवावा.
 
 

abc_1  H x W: 0