सेलिब्रिटी टॉक्स : राजेंद्र कुमार

Sandyanand    25-Jul-2020
Total Views |

lhjgl _1  H x W 
 
चित्रपटसृष्टीतील माझ्या जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये माझा एकच मित्र होता आणि तो म्हणजे राज कपूर. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोललं गेलं किंवा आठवण निघाली तरीही माझ्या मनात काही चलबिचल होते. हृदयाच्या तारा झंकारतात, असंही म्हणता येऊ शकेल. आम्ही तर जवळपास रोजच भेटायचो. नाहीतर फोनवरुन तरी बोलणं व्हायचंच. व्यवसाय, घर, कुटुंब अशा सगळ्याच विषयात आम्ही एकमेकांशी बोलत असू. त्यामुळे ते गेल्यानंतर माझ्या आयुष्यातील फार मोठा हिस्सा तुटून गेल्यासारखं वाटतं. 'संगम' चित्रपटावेळची आठवण आहे.
 
त्या चित्रपटात एक गाणं आहे की, 'दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा..' या गाण्याचे शब्द ऐकून मी वेगळं मत मांडलं होतं की, गाण्याच्या या ओळी मूळ कथेशी सयुक्तिक वाटत नाहीत. कारण, दोस्त तर तुझा आहेच. आणि प्यार तर तुलाच मिळालेलं आहे. मग फदोस्त दोस्त ना रहा..' अशी स्थिती नाही आणि 'प्यार प्यार ना रहा', असंही राहिलेलं नाही. मला त्या ओळी पटल्याच नव्हत्या. पण, राज जी म्हणाले मला ते पिक्चराईज करु दे... त्यांनी माझा आणि वैजयंतीमाला यांच्या मोठ्या क्लोजअप वर त्या गाण्याच्या ओळी सुपरइंपोज केल्या. स्वतः ते कॅमेऱ्यापासून दूर राहिले. फारच कमी वेळा स्वतः दिसले. मूळ गाण्याची तीन कडवी होती. तर चित्रपटात ती दोनच ठेवली गेली. राज कपूर हे उत्तम चित्रपट कलावंत होते. त्यांना या माध्यमाची चांगली जाण होती. त्यामुळे ते वेगवेगळ्या मार्गांनी आपली गोष्ट चांगल्या पद्धतीने सादर करायचे. शिवाय, गाण्याचं वैशिष्ट्य हे की गाणी हा त्या कथेचाच एक भाग वाटत असत. ते गाणंच ती कथा पुढे घेऊन जात असे. म्हणूनच, त्यांची गाणी खूपच लोकप्रिय होत असत.