'बडे अच्छे लगते है...' हे माझं गाणं जरी लोकप्रिय झालेलं असलं तरीही मला असं वाटतं, की मला खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा मिळाली ती १९८०-८१ मध्ये आलेल्या फलव्ह स्टोरीफ नावाच्या चित्रपटातील गाण्यांमुळे. फयाद आ रही है...' किंवा 'देखो मैने देखा है ये इक सपना...' अशी गाणी होती. आर. डी. बर्मन यांचंच संगीत होतं. पण, त्यांना स्वतःलाच त्या ट्यून आवडल्या नव्हत्या. विशेषतः फयाद आ रही है...' हे गाणं तयार होत असताना ते नाराजीनंच मला म्हणाले होते की, हे कसलं भजन गायल्यासारखं वाटतंय. पण, गंमत म्हणजे ते गाणं खूपच लोकप्रिय झालं. 'आरडीं' नी मला चांगली संधी दिली.
माझ्या वडिलांनंतर मला तेवढा पाठिंबा देणारे 'आरडी' होते. १९८७ ला माझे वडील किशोरकुमार यांचं निधन झालं आणि लोकांनी माझ्याकडे पाहायला सुरुवात केली. किशोरजींना पर्याय म्हणून मला गाणी मिळाली. पुढची जवळपास ६-७ वर्षं मी सतत काम करीत होतो. खूप गाणी गायिलो. अनेक गाणी लोकप्रिय झाली. पण, १९९२ च्या आसपास मला स्वतःलाच असं वाटलं, की मी आता थांबायला हवं. कारण, पिढी बदलत होती. अनेक नवे गायक येऊ लागले होते. त्यांची शैली होती. शिवाय, याही क्षेत्रात राजकारण सुरू झालं. लॉबिंग सुरू झालं. मी म्हटलं, की आमच्या काळात तर हे काहीच नव्हतं. मग मीच थांबायचं ठरवलं. मीच गाणी नाकारू लागलो आणि आपणहून या सगळ्यातून बाजूला गेलो.