साडी कितीही महाग असली तरी तिला खरी शोभा येते ती ब्लाऊजमुळेच. त्यामुळे ब्लाऊज चांगला असायलाच पाहिजे हा कायम कटाक्ष हवा. स्वस्त साडी असली तरीही त्यालाही हेच लागू होते. साडीवरील ब्लाऊज उत्तम आणि शोभेल असा असेल तर त्या साडीला गेटअप येतंच. म्हणून कोणताही ब्लाऊज कोणत्याही साडीवर घालणं टाळा. फॅशन ट्रेंडस काय आहेत ते लक्षात घ्या आणि बिनधास्तपणे ते फॉलोसुद्धा करा...
फॅशन डिझाइनर्स म्हणतात...
ब्लाऊजच्या मागच्या बाजूला नेट लावून त्यावर पाहिजे ते डिझाइन करून घेण्याचा ट्रेंड हिट आहे. यामध्ये डोली काढली जाते, राधा-कृष्णाची रासलिला बघायला मिळते, ज्या वधू-वरांचं लग्न आहे त्यांचे फोटो एम्बॉस केले जातात, ब्लाऊजला खूप घुंगरू आणि लटकन लावली जातात. दक्षिणेकडे ब्लाऊजच्या मागच्या बाजूला डोली काढण्याची खूप फॅशन आहे. तर आपल्याकडे ब्लाऊजच्या मागच्या बाजूला आणि बाहीवर नथ एम्ब्रॉयडरी किंवा वर्क करून घेण्याची फॅशन आहे.
काही हटके पर्याय...
- डबल टी शट लुकमध्ये ब्लाऊजही घालू शकतो. एखाद्या खास प्रसंगी तुम्ही कशिदाकाम केलेलं ब्लाऊजही तयार करून घेऊ शकता.
- जर तुम्हाला साडीबरोबर आकर्षक आणि मॉडर्न लुक हवा असेल तर स्ट्रक्चरल ब्लाऊजला तुमच्या फॅशनचा हिस्सा बनवा. या ब्लाऊजमध्ये खूप कशिदाकाम केलेलं असतं, त्यामुळे एक वेगळीच चमक येते.
- या सीझनमध्ये सगळ्यात मोठ्या दोन फॅशन ट्रेंड आहेत, क्रॉप टॉप आणि बेल स्लीव्हस. तुम्ही या दोन्ही ट्रेंडचा उपयोग करत तुमच्यासाठी ब्लाऊज डिझाइन करू शकता. आकर्षक रंगाची निवड करत तुम्ही तुमचा लुक उत्तम बनवू शकतो.
- स्लिव्हलेस आणि डीप नेक किंवा स्ट्रेपलेस ब्लाऊजही खूप छान दिसतात. यामुळे बोल्ड लुक मिळतो. तुम्हाला असा लुक आवडत असेल तर निश्चितपणे असे ब्लाऊज तुमच्या वॉडरोबमध्ये असू द्या.
- विरोधी रंगातील आणि पारदर्शक बाह्यांची सध्या फॅशन आहे. शिवाय त्या दिसतातही खूप छान. तेव्हा हा पर्यायसुद्धा अवश्य आजमावून बघा.
कस्टमाइज ब्लाऊज...कधी कधी अशी परिस्थिती ओढावते की, साडीची किंमत कमी आणि ब्लाऊजची शिलाईच जास्त. पण असे ब्लाऊज आकर्षणाचा बिंदू ठरतात, हे वेगळ्याने सांगायला नको. साडी साधी असेल आणि ब्लाऊज थोडं वेगळं असेल तर निश्चितपणे साडी ऊठावदार दिसते. म्हणून कधी कधी कस्टमाइज ब्लाऊजला प्राधान्य द्या. विशेषतः लग्न, तुमच्या घरातील एखादा कार्यक्रम, पाटी अशा प्रसंगी हे ब्लाऊज तुमचं वेगळेपण दाखवतील.
महत्त्वाची गोष्ट..
ब्लाऊजचं फिटिंग जेव्हा उत्तम असेल तेव्हाच तो चांगला दिसेल. म्हणून ब्लाऊज नेहमी उत्तम शिवून मिळेल अशाच ठिकाणी टाका. तरच तो चांगला दिसेल. अन्यथा त्यावरील वर्क, लटकन काही उपयोगाचे ठरणार नाही.