आयुष्यात अल्कोहोलच्या थेंबाला हात लावला नाही, असं आता हयात असलेला कोणताही माणूस म्हणू शकणार नाही. कोरोनाचा विषाणू अल्कोहोलसमोर तग धरू शकत नसल्याने अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझरशिवाय आता कुणाचंही पान हलेनासं झालेलं आहे.
उत्तराखंड म्हटलं की अनेकांना कोरोनावरचे तथाकथित उपचारच आठवतील. कोरोनाच्या प्रसारानंतर इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणारे काढे किंवा खोकल्यावरची औषधंही लोकांनी या रोगावरचा रामबाण उपाय म्हणून खपवायला सुरुवात केली होती. या रोगाचे ८० टक्क्यांहून अधिक पेशंट काहीही उपाय न करताच बरे होतात. गुळण्या, वाफारा, गरम पाणी एवढंच त्यांना पुरतं. त्यामुळे १०० रोग्यांना काढा किंवा खोकल्याचं औषध द्यायचं आणि आपल्या औषधाने त्यातले ८०हून अधिक लोक बरे झाले असा दावा करायचा, हे सहज शक्य होतं. आज अनेक प्रतिबंधात्मक औषधं जोरात विकली जातायत. त्यांच्यामागचं खरं इंगित हे आणि एवढंच आहे.
इथल्या फोटोतल्या बाटलीवरही मफॉर सेल इन उत्तराखंड ओन्लीफ असं लिहिलेलं आहे. शिवाय त्यावर अँटि कोरोना व्हायरस असंही लिहिलेलं आहे. ही बाटली कशाची आहे ते सांगायची गरज नाही. या मादक पेयातल्या अल्कोहोल या घटकानेच सध्या कोरोना विषाणूला थोपवून ठेवलेलं आहे. आयुष्यात अल्कोहोलच्या थेंबाला हात लावला नाही, असं आता हयात असलेला कोणताही माणूस यापुढे म्हणू शकणार नाही. कारण, कोरोनाचा विषाणू या अल्कोहोलसमोर तग धरू शकत नसल्याने अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझरशिवाय आता कुणाचंही पान हलेनासं झालेलं आहे. अशावेळी अनेकांना मद्य हेही कोरोनावरचं कसं उपयुक्त औषधच आहे, असं वाटू शकतं. पण, तशी पट्टीच चिकटवणं म्हणजे जरा जास्त झालं ना!