छत्तीसगडमधील हत्तींची आहेत लडीवाळ नाव

Sandyanand    02-Jul-2020
Total Views |


Elephants_1  H
Elephants_1  H


माणूस, गावे, शहरांच्या ओळखीत नावाची भूमिका सर्वांत महत्त्वाची असते. घरातील पाळीव प्राण्यांनाही आवडीनुसार नावे दिली जातात. जंगलातील प्राण्यांना अशी काही नावे असल्याचे तुम्ही ऐकले नसेल, छत्तीसगडमध्ये अशी प्रथा आहे. येथील जंगलांमध्ये वावरणाऱ्या हत्तींना चक्क नावांनी ओळखले जाते आणि ही नावेही विचारपूर्वक दिली जातात!

हत्तींना नावे देण्याची ही प्रथा छत्तीसगड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी १९९०पासून सुरू केली आहे. म्हणजे त्याला आता तीस वर्षे झाली आहेत. हत्तींना नावे देताना तो आढळत असलेला जंगलाचा भाग, गावाचा परिसर, तेथील सांस्कृतिक परंपरा व सणांचा विचार केला जातो. हत्तींच्या वर्तणुकीवरूनही त्यांना नावे दिली जातात. घनदाट जंगलांमुळे छत्तीसगडमध्ये जंगली हत्तींची संख्या लक्षणीय आहे. या राज्यातील सरगुजा वन विभागात १९९०पासून हत्तींच्या नामकरणाला प्रारंभ झाला. त्यावेळी माणसांवर हल्ले करणारा एक हत्ती पकडण्यात येऊन त्याचे नामकरण 'सिव्हिल बहादूर' असे करण्यात आले होते. माणसांवर हल्ले करण्याच्या सवयीमुळे बंदिवासात ठेवलेला हा हत्ती आजही तेथे आहे. काही कारणांमुळे काही काळ ही प्रथा बंद पडली होती; पण आता पुन्हा ती सुरू झाली आहे. 

वन विभागाने नावे दिलेले 'बहरादेव', 'महान', 'प्यारे' आदी हत्ती जंगलात सुखाने कालक्रमण करत आहेत. यातील काही कळपांत आहेत तर काहींनी एकटे राहणे पसंत केले आहे.

छत्तीसगडच्या वन विभागाने हत्तींना दिलेली काही नावे अशी : 
सिव्हिल बहादूर : याला कुसमी गावाजवळ असलेल्या सिव्हिलदागमधून पकडण्यात आले होते. आता तो बंदिवासात आहे. 

लाली : अंबिकापूर लगतच्या लालमाटी जंगलातून याला पकडण्यात आले होते. 

 
बहरादेव : या नावाचा खरा अर्थ आहे बहिरा. हा हत्ती माणसांवर हल्ला करत असे आणि त्याला हाकलण्यासाठी लोकांनी केलेल्या प्रयत्नांना, त्यांच्या ओरडण्याला तो घाबरत नसे. म्हणजे बहिरा असल्याप्रमाणे त्याची वर्तणूक असल्याने त्याला हे नाव दिले गेले.


महान : सूरजपूर जिल्ह्यातील महान नदीकाठी याचे वास्तव्य आहे. 

प्यारे : हत्तींचा ठावठिकाणा समजावा, त्यांची वर्तणूक कळावी म्हणून उपग्रह संदेशांवर आधारित रेडिओ कॉलर या हत्तीच्या गळ्यात अडकविण्यात आली आहे. हा हत्ती अंगापिंडाने चांगला दणकट व देखणा असल्याने त्याला हे लाडाचे नाव मिळाले आहे.

मोहन : सूरजपूर वन विभागातील मोहनपूरच्या जंगलात याने बराच काळ वास्तव्य केले आहे. 

खोपादेव : सरगुजा परिक्षेत्रातील रहिवाशांचे आराध्यदैवत खोपा हे आहे. या देवस्थानानजिक हा हत्ती बराच काळ वावरत असल्याने त्याला हे नाव देण्यात आले. सध्या हा हत्ती मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्याच्या जंगलात गेला आहे.

हत्तींच्या कळपांनाही अशी नावे देण्यात आली आहेत : 
अशोक दल : या कळपातील हत्ती शांत स्वभावाचे असून, नुकसान न करणारे आहेत. अंबिकापूर जिल्ह्यात येताना व जाताना त्यांनी कोणाचे काही नुकसान केले नव्हते म्हणून त्यांच्या कळपाला हे नाव मिळाले आहे. 

बांकी दल : सूरजपूर जिल्ह्यातील प्रतापपूर, सूरजपूर तसेच बलरामपूर जिल्ह्यातील राजपूर वन विभागातून वाहणाऱ्या बांकी या नदीच्या काठी वास्तव्य असल्याने या कळपाला या नदीच्या नावाने ओळखले जाते. 

करमा दल : छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जाणाऱ्या करमा सणाच्या दिवशी हत्तींच्या कळपात एका नव्या पिलाचा जन्म झाल्याने या कळपाला हे नाव मिळाले. 

गौतमी दल : अशोक दलातील एका हत्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. नंतर या कळपातील काही हत्ती वेगळे होऊन ओडिशात गेले व तेथे कळपातील एका हत्तीणीला रेडिओ कॉलर लावण्यात आली. सम्राट अशोक यांच्या पत्नी गौतमी यांच्या नावावरून या कळपाला गौतमी दल असे नाव दिले गेले आहे. 

गुरू घासीदास दल : गुरू घासीदास राष्ट्रीय अभयारण्यात वास्तव्य असल्याने या कळपाला हे नाव दिले गेले आहे.