सेलिब्रिटी टॉक्स रजत कपूर

Sandyanand    02-Jul-2020
Total Views |


Rajat kapoor_1  


'सूरज का सातवां घोडा' आणि 'मेकिंग ऑफ महात्मा' या दोन चित्रपटांच्या दरम्यानच 'ब्योमकेश बक्षी' नावाची मालिका आली, ती मात्र लोकप्रिय ठरली. मला 'ब्योमकेश बक्षी' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली असं म्हटलं जातं. पण, मी 'लव्ह लेटर्स' नावाचं इंग्रजी नाटक केलं होतं. ते पाहून श्याम बेनेगल यांनी मला 'सूरज का सातवां घोडा' या चित्रपटातील मुख्य भूमिका मला दिली होती.

त्या चित्रपटाचं किंवा माझ्या कामाचं कौतुक जरी होत असलं तरी गंमत म्हणजे त्याकाळी तो चित्रपट फारसा कोणी पाहिलाच नव्हता. त्यामुळेच तो चित्रपट पाहून पुढच्या काही ऑफर्स आल्या नाहीत. मी शाळेत असताना हिंदीतील नाटक स्वतःच लिहायचो. पण, कॉलेज आणि त्यानंतरही मुख्यतः इंग्रजी नाटकच केलं. मला नाटक-चित्रपट करायचे होते. पण, तरीही व्यावसायिक घरातील असल्यामुळे ती एक वेगळीच जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये मला प्रवेश घेता आला नाही. 

साहजिकच, नाटकांचं अधिकृत शिक्षण मला मिळू शकलं नाही. कॉलेजमध्ये असताना मी गाणी म्हणायचो. हार्मोनियमही शिकत होतो. वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असल्यामुळे 'आवाजा'वर काम करत राहिलो. पण, औपचारिकरित्या आवाजासाठी वगैरे जे काही शिक्षण घेता आलं असतं आणि ज्यामुळे माझ्यात काही कौशल्यवृद्धी झाली असती, ते मात्र जमलं नाही.