पोलिसांची अद्ययावत वैद्यकीय माहिती गोळा करणार

16 Jul 2020 14:39:58
 
 
 
लष्कराच्या धर्तीवर स्वातंत्र्यदिनापासून माहिती संकलनाचा उपक्रम सुरू होणार
 
लष्कराप्रमाणे पोलिस दलात कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याची सातत्याने संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून या तपशिलांचा मध्यवर्ती डेटाबेस तयार केला जाणार आहे. सक्षम पोलिस दल निर्माण करण्याच्या उद्देशाने मुंबई पोलिसांनी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून, स्वातंत्र्यदिनापासून वैद्यकीय चाचण्यांना सुरुवात होणार आहे. या उपक्रमांतर्गत सर्व प्रकारच्या र्नतचाचण्या, हृदयाशी निगडित टू डी एको, टीएमटी चाचणी, श्वसन संस्था व फुफ्फुसाशी संबंधित पीएफटी चाचणी, कर्करोग, दात आणि डोळ्यांसह स्त्रीरोगाशी निगडित सर्व चाचण्या केल्या जाणार आहेत. मुंबई पोलिस दलात ४५ हजारांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे. इतक्या मनुष्यबळाची चाचणी करून घेण्यासाठी आवश्यक असलेली अद्ययावत उपकरणे, यंत्रे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ-तंत्रज्ञ आणि डेटाबेस तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी मंडळींची व्यवस्था उभी करण्याचे काम सध्या नागपाड्यातील पोलिस रुग्णालयात वेगाने सुरू आहे.
 
या व्यवस्थेद्वारे वर्षभरात १८ ते २० हजार पोलिसांची संपूर्ण चाचणी पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे पुढील अडीच वर्षांत संपूर्ण पोलिस दलाची चाचणी पूर्ण करून त्यांचे अहवाल डेटाबेसमध्ये उपलब्ध होऊ शकतील. ४५ किंवा त्याहून जास्त वय असलेले अधिकारी, अंमलदारांची वर्षांतून एकदा, तर ४० किंवा त्याखालील अधिकारी, अंमलदारांची तीन वर्षांनी एकदा संपूर्ण चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात या उपक्रमामुळे पोलिस दलातील प्रत्येक अधिकाऱ्याच्या व्यावसायिक तपशिलांसह वैद्यकीय तपशीलही एका क्लिकवर उपलब्ध होईल. वर्षभरापासून या उपक्रमाची आखणी सुरू होती. कोरोनामुळे काही काळासाठी काम थांबल्याने उपक्रम लांबणीवर पडला. मात्र, आता हे काम वेगाने सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. आवश्यक ती यंत्रे, उपकरणांच्या खरेदीसह नागपाडा पोलिस रुग्णालयाचा कायापालट वेगाने सुरू आहे, अशी माहिती पोलिस सहआयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी दिली. शासन, पोलिस कल्याण मंडळ आणि देणगीदारांनी केलेल्या आर्थिक मदतीतून हे काम सुरू असून, वर्षभरात सुमारे २० हजार पोलिसांचे संपूर्ण, मिनी चेकअप करून घेण्यासाठी पाच ते सहा कोटींचा अंदाजित खर्च आहे, असे बजाज यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0