नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा अभिजित बांगर यांनी स्वीकारला कार्यभार

Sandyanand    16-Jul-2020
Total Views |

ASAD_1  H x W:  
 
 
नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांनी अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. पुणे विद्यापीठातून एम. ए.ची (अर्थशास्त्र) पदवी मिळवलेले अभिजित बांगर २००८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. बांगर यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यातील माणगावचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर काम पाहिले आहे. काही काळ त्यांनी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. नवनिर्मित पालघर जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी कामगिरी केली. अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. नागपूरचे आयुक्त असताना त्यांनी स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरचे मानांकन उंचावले होते. नवी मुंबईत सर्वांच्या सहकार्याने कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे बांगर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बोलताना सांगितले.