कोरोना रुग्णसेवेतील कर्मचाऱ्यांना कल्याण महापालिकेचे ५० लाखांचे विमा कवच

Sandyanand    16-Jul-2020
Total Views |
 
scv_1  H x W: 0
 
 
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णसेवेत असलेल्या महापालिका व परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५० लाख रुपयांच्या सुरक्षा विमा कवच योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या साडेतीन महिन्यांपासून कल्याणडोंबिवली महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी सेवा देत आहेत. मार्च-एप्रिल- मेमध्ये कर्मचाऱ्यांनी रोज सुमारे एक लाख ७५ हजार भोजन पाकिटेवाटपाचे काम केले. त्यानंतर घरोघरी रुग्ण तपासणी सर्वे क्षण, संशयित, बाधितांना विलगीकरण केंद्रे, रुग्णालयात नेणे, अशी जोखमीची कामे पार पाडली.
 
ही कामे करताना काही पालिका अधिकारी-कर्मचारी कोरोना संसर्गाने बाधित झाले. उपचार घेऊन ते सुखरूप घरी परतले. कामावर येऊन पुन्हा कोरोना रुग्णसेवेत दाखल झाले आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीत करोना रुग्णसेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग किंवा आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली, तर केंद्राने अशा कर्मचाऱ्यांसाठी 'राष्ट्रीय स्वास्थ मिशन' अंतर्गतफ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाची बाधा होऊन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दि न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीच्या अपघात विमा योजनेतून ही र्नकम मिळणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या योजनेचा लाभ ३० सप्टेंबरपर्यंत किंवा केंद्राने मुदतवाढ दिल्यास त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.