आजचे काम आजच हो़ण्यासाठी... बनवा टू डू लिस्ट

Sandyanand    15-Jul-2020
Total Views |
 
lhjgl _1  H x W
 
 
काम करत असतो. एकामागून दुसरं, दुसऱ्यामागून तिसरं... दिवस संपतो... म्हणजे आपण तो संपवतो आणि त्या दगदगीतून बाहेर पडल्यावर अनेक गोष्टी आठवतात. अरे, हे करायचं राहिलं! आणि तेही करायचं विसरून गेलो! राहिलेल्या कामांची जंत्रीच मग डोळ्यासमोर येते. आपण अस्वस्थ होतो. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आपण कशा बरं विसरलो, असा प्रश्न राहून राहून सतावतो. घरची कामं, ऑफिसमधली कामं, मासिक बिलं...सर्व कामं लक्षात ठेवणं मानवी मनाला फारसं सोपं नाही. पण यावर एक उपाय आहे, तो म्हणजे टू डू लिस्ट करणं. आपल्या डोळ्यांसमोर सतत ती यादी ठेवायची. एक छान डायरी किंवा वही घ्या. त्यात रोज रात्री एक टू डू लिस्ट तयार करून समोर ठेवा.
 
महत्त्वाच्या कामासमोर एखादी विशिष्ट खूण करा. जसजशी कामं होतील तशी त्यांना काट मारा. त्यामुळे कोणती कामं झाली आहेत आणि कोणती कामं राहिली आहेत, हे लक्षात येईल. या यादीतील सगळीच कामं होतील असं नाही, काही कामं राहतीलसुद्धा. मग ती कामं दुसऱ्या दिवशीच्या यादीत लिहा, म्हणजे दुसऱ्या दिवशी करता येतील. कामं राहिली की, त्यांचं ओझं तयार होतं. जुनी कामं आणि नवीन कामं यांचा भार फार त्रासदायक वाटतो. आपण काम करण्यास समर्थ नाही, अशी भावनादेखील मनात घर करते. हाती घेतलेल्या कामात लक्ष लागत नाही. त्यामुळे वेळेत केलेलं काम फायद्याचं ठरतं. सर्वांनाच दिवसाचे चोवीस तास मिळतात. पण काही जणांना ते कमी पडतात. वेळ कसा घालवावा याची नीट योजना न केल्यामुळे बराच वेळ वाया जातो. अशाने वेळ कसा पुरेल? आपला संपूर्ण दिवस कसा घालवणार आहोत, याची योजना करा. कुणालाही वेळ दिली तर ती पाळा. शक्य तेवढीच कामं हाती घ्या. रोज एक टू डू लिस्ट बनवा आणि तिच्याप्रमाणे जा. वेळ तर वाचेलच शिवाय कामंही पूर्ण होतील.