तुमचं ऑफिसचं काम दिवसभरात पूर्ण होतं का?

Sandyanand    14-Jul-2020
Total Views |
 
 

ASAD_1  H x W:  
 
 
काम पूर्ण न होत नसतं तेव्हा दिवसाचे चोवीस तासही कमी वाटतात. वेळ पुढे सरकत रहातो आणि ठरलेल्या वेळात आपलं काम संपणार कसं, हा प्रश्न पडतो... ऑफिसला वेळेवर पोहचल्यानंतरही संध्याकाळपर्यंत तुमचं दिवसभराचं काम पूर्ण होत नाही का? दिवसभर तुम्ही हाच विचार करत रहाता का, माझं काम पूर्ण होत नाही. काळजी करू नका, असं अनेक लोकांच्या बाबतीत घडतं. कामाच्या वेळेस आपलं लक्ष इकडे-तिकडे जातं. ज्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होतो. साहजिकच काम करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो. अशावेळेस काही मुद्दे लक्षात ठेवले, तर निश्चितपणे असं होणं टाळता येईल...
 
 प्राथमिकतेकडे लक्ष द्या
आवडीचं काम करत बसलात तर आवश्यक काम टाळलं जाईलच आणि ऑफिसमधून घरी जाण्याची वेळ कधी येईल हे कळणारच नाही. म्हणून प्राथमिकता ठरवता येणं जमायला हवं. म्हणजेच आवश्यक कामं आधी करायला हवीत. यामुळे तुमची कार्यक्षमता सुधारेल. सकाळीच दिवसभर काय करणार आहात, हे ठरवा. यामुळे बरीच मदत होईल.
 
स्वतःचं आकलन करण्यास शिका
कोणत्याही गोष्टीला आपली सवय बनविण्याआधी तिचं महत्त्व आधी समजून घ्या. जर तुम्हाला असं वाटलं की, सकाळपासून लंच ब्रेकपर्यंत आपण खूप काम केलं आता निवांत डबा खाऊ आणि मित्रांशी गप्पा मारू, यामध्ये वाईट अजिबातच काही नाही. फक्त यावेळेस वेळेचं भान ठेवा. तसंच इतरांचा वेळही महत्त्वाचा आहे, हे लक्षात असू द्या. जर तुमचं काम व्यवस्थित गतीने सुरू असेल तर इतरांचा वेळ तुमच्यामुळे वाया जाणार नाही, याची काळजी अवश्य घ्या. थकवा दूर करण्यासाठी थोडा आराम करा. पण अर्थातच इतरांना त्रास न देता.
 
पद्धती योग्य असावी
आपण कशा पद्धतीने बसतो, याकडे अजिबात लक्ष देत नाही. काम करत असताना एकटक क़ॉम्प्युटर स्क्रीनकडे बघत रहाणे किंवा एकाच मुद्रेत बसणं ठीक नाही. यामुळे डोळे थकतात. पाठ, खांदे आणि पाय यावर वाईट परिणाम होतो. हा थकवा, आपल्या मेंदुवर परिणाम करतो. याचा आपल्या गतीवर परिणाम होतो. अनेकदा असंही होतं की, आपण नुसतेच रिकामे बसून रहातो यामुळे आपल्याला कंटाळा येतो. काम करत असताना आपलं पोश्चर बदला. त्याचबरोबर नियमित योगा आणि व्यायाम करा.
 
सोशल लाइफला करा स्विच ऑफ
ऑफिसमध्ये पोहचताच सगळ्यात आधी जी-मेल, फेसबुक उघडून त्यामध्येच वेळ घालविणे किंवा दिवसभर मोबाइलवर मेसेज करण्यात वेळ वाया घालविणे योग्य नाही. ही सगळी कामं ऑफिसमधून घरी आल्यानंतर करावीत. अनेक संशोधनं सांगतात की, आपण काम करत असताना मोबाइल फोन आपलं सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत असतो. वेळ वाचण्यासाठी मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवा.
 
स्वतःचा आदर करा
दिवसभरात एक काळ असा असतो की, आपण मनापासून आपल्या कामात रमतो. या वेळात जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करा. जेवढी कामं पूर्ण करायची आहेत, त्यांची एक डेडलाइन ठरवा. वेळेत काम पूर्ण केल्यानंतर स्वतःची पाठ थोपटायला, स्वतःचं कौतुक करायला अजिबात विसरू नका. यामुळे स्वतःला प्रोत्साहन मिळेल.