कोरोना प्रतिबंधासाठी मुंबईप्रमाणे सुविधा उभारा

Sandyanand    12-Jul-2020
Total Views |

rt_1  H x W: 0  
 
ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश
 
ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढ चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे सुविधा तातडीने उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना दिले. जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयशाचा ठपका ठेवून पालिका आयुक्तांच्या बदल्यांचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर मुंबई महापालिकेप्रमाणे कार्यपद्धती अमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुन्हा टाळेबंदीची अनुमतीही पालिकांना देण्यात आली. मात्र, त्यानंतरही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकांना यश आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पालिका आयुक्तांशी संवाद साधत कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
 
यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता उपस्थित होते. कोरोनाची वाढ गुणाकाराने होत आहे. त्यामुळे तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईत ज्यारीतीने सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत, तशा सुविधा ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी करणे अपेक्षित होते. वारंवार तशा सूचना देऊनही पाहिजे तेवढ्या सुविधा उभारल्याचे दिसत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणे सुरू करा. यात मोठे उद्योग, कंपन्या, संस्थांचीही मदत घ्या. मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ड्रेनेज, शौचालये, पिण्याचे पाणी या सोयी आहेत. आयसीयू, डायलिसिस सुविधा आहेत. तशाच सुविधा निर्माण करा. तसेच, औषधांचाही पुरेसा साठा करून ठेवा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.