वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मानले आभार

12 Jul 2020 13:04:21

 
 
कल्याण परिमंडलात ग्राहकांशी संवाद सुरूच; वेबिनार, ग्राहक मेळावे यांचा वापर
 
लॉकडाऊन व नंतरचा जून या तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल अचूक असल्याचे समजून सांगण्यात मुख्य अभियंत्यांसह वरिष्ठ अधिकारी, अभियंते व कर्मचारी कल्याण परिमंडलात व्यस्त आहेत. यासंदर्भात https://billcal. mahadiscom.in/consumerbill/  या लिंकवर  प्रत्येक ग्राहकाला वीजबिलाची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिमंडलातील सर्वच ४० उपविभागात वेबिनार, ग्राहक शिबिरे, मोबाईल व प्रत्यक्ष संवादाद्वारे ग्राहकांशी संपर्क सुरू आहे. वीजबिल भरणाऱ्या सर्व ग्राहकांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत.
 
महावितरणच्या कल्याण परिमंडलात कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम, उल्हासनगर, बदलापूर, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, वसई, वाडा, आचोळे, विरार, नालासोपारा, बोईसर, डहाणू, जव्हार, पालघर, मोखाडा, सफाळे, विक्रमगड, तलासरी आदी भागातील सर्वच ४० उपविभागीय कार्यालयांकडून वेबिनार, ग्राहक मेळावे, नोंदणीकृत मोबाईल व प्रत्यक्ष संवादाद्वारे ग्राहकांना वीजबिलाची माहिती देण्याचे काम सुरू आहे. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंते धर्मराज पेठकर, सुनील काकडे, किरण नगावकर, मंदार अत्रे (प्रभारी) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, अभियंते व कर्मचारी ग्राहकांना वीजबिल समजावून देण्याच्या प्रक्रियेत गेल्या तीन आठवड्यांपासून, सुटी न घेता व्यस्त आहेत. वीजबिलाच्या विश्लेषणावर समाधानी झालेल्या ग्राहकांनी बिलाचा भरणा करून सहकार्य केले असून, इतर ग्राहकांनीही उपलब्ध सुविधांचा उपयोग करून बिलाची पडताळणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0