बॉबकट हत्तीणीवर नेटकरी फिदा

11 Jul 2020 12:23:00
 
 
हत्तीची हेअरस्टाइल... हा शब्द ऐकायला विचित्र वाटतो ना. हत्तीची कधी हेअरस्टाइल असते का? सगळ्या हत्तींची नसेल, पण सेंगमलम या हत्तीणीला मात्र हेअरस्टाइल आहे. या हत्तीणीचा बॉबकट आहे व उन्हाळ्यात तिचे केस तीनदा धुवावे लागतात.
 
तमिळनाडूतील सेंगमलम या हत्तीणीचे सोशल मीडियावर खूप फॅन आहेत. कारण तिच्या बॉबकटवर इंटरनेटवरील असंख्य लोक फिदा आहेत. मन्नरगुडी या गावातील राजगोपालस्वामी मंदिरात तिचे वास्तव्य आहे. तिच्या केसांचा बॉबकट करण्यात आला आहे. त्यामुळे तिला प्रेमाने 'बॉबकट सेंगमलम' असे संबोधले जाते. जेव्हा तिची हेअरस्टाइल करण्यात आली, तेव्हाच तिचे फॅन वाढायला लागले होते.
 
आता तमिळनाडूच्या वनअधिकारी सुधा रामन यांनी तिचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले, तेव्हा पुन्हा एकदा देशभरातील लोकांचे तिच्या अनोख्या हेअरस्टाइलकडे लक्ष गेले. त्यांनी पोस्ट केलेले फोटो थोड्याच वेळात व्हायरल झाले आणि त्यांना किमान दहा हजार लाइक्स मिळाल्या. मंदिरात येणारे भाविक नेहमीच तिचे फोटो काढतात आणि ते सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होत असतात, असे आजवर दिसून आले आहे. सेंगमलमला राजगोपालस्वामी मंदिरात आणले, ते केरळमधून. तिच्या माहुताने एस. राजगोपालने तिची ही हेअरस्टाइल मोठ्या आवडीने केली होती. ही केशरचना कायम राखण्यासाठी खूप लक्ष द्यावे लागते, काळजी घ्यावी लागते.
 
'सेंगमलम मला माझ्या मुलीसारखी वाटते. ती इतरांपेक्षा वेगळी दिसावी, असे मला वाटत होते. एकदा मी इंटरनेटवरच एका छोट्या हत्तीला बॉबकटमध्ये पाहिले होते. तेव्हा मला ही कल्पना सुचली आणि मी सेंगमलमचे केस वाढवायला सुरुवात केली,' असे राजगोपाल याने सांगितले. तिचे केस उन्हाळ्यात तीनदा धुवावे लागतात आणि इतर ऋतुंमध्ये दिवसातून किमान एकदा तरी धुवावे लागतात. त्यासाठी राजगोपाल याने ४५ हजार रुपयांचा एक खास शॉवर विकत घेतला आहे. या शॉवरने उन्हाळ्यात तिला आंघोळही घालत असतो.
Powered By Sangraha 9.0